Thane News : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचे फेसबुक या समाजमाध्यामावर अर्धनग्न छायाचित्र प्रसारित केल्याप्रकरणी अनंत करमुसे (Anant Karmuse) यांच्याविरोधात वर्तकनगर पोलिसांनी ठाणे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहेत. सुमारे दोन वर्षांपूर्वी करमुसे यांच्याविरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे करमुसे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. तर करमुसे यांनीही आपल्याला आव्हाड यांच्या निवासस्थानी त्यांच्यासमोर मारहाण झाल्याचा आरोप केला होता. त्यात गुन्हा दाखल होऊन काही जणांना अटक देखील झाली होती. त्यावेळी हे प्रकरण प्रचंड गाजले होते आणि जितेंद्र आव्हाड तसेच माहविकास आघाडी सरकारला टीकेचे धनी व्हावे लागले होते.


या प्रकरणात करमुसे याने तपासकामात कोणत्याही प्रकारचे सहाय्य केले नसल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला असून त्याने दाखल केलेली याचिकाही स्वच्छ हेतूने केली नसल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. करमुसे याचे ट्वीट आणि फेसबुक पोस्ट हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कक्षेबाहेर असल्याचेही न्यायालयाने नमूद केले आहे. अनंत करमुसे याने जितेंद्र आव्हाड यांचे अर्धनग्न अवस्थेतील मॉर्फ केलेले छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित केले होते. या प्रकरणाचा तपास करुन पोलिसांनी 6 एप्रिल 2020 रोजी भादंवि 292, 500 तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 च्या कलम 66 (ई) अन्वये गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यातील दोषारोपपत्र ठाणे न्यायालयात दाखल करण्यात आहे. तसेच अनंत करमुसे याला समन्स बजावण्यात आले आहे. 


दोषारोपपत्रात करमुसेंच्या वर्तणुकीवर ताशेरे
या आरोपपत्रामध्ये पोलिसांनी करमुसे यांच्या वर्तणुकीवर ताशेरे ओढले आहेत. करमुसे यांच्या जप्त केलेल्या फोनमध्ये जितेंद्र आव्हाड यांचे अर्धनग्न छायाचित्र सापडले होते. मात्र, असे असतानाही करमुसे यांनी पोलिसांना तपासात कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले नसल्याचे या आरोपत्रात नमूद करण्यात आले आहे. आरोपी करमुसे यांनी स्वतःच्या मोबाईल फोनमधून स्वतःच्या फेसबुक अकाऊंटवरुन जितेंद्र आव्हाड यांचा एडिट केलेला अर्धनग्न अवस्थेतील अश्लील फोटो अपलोड करुन प्रसिद्ध केला. हा मोबाईल फोन जप्त करुन फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवला असता, जातीद्वेष-धर्मद्वेष, व्यक्तीद्वेष आदी 27 प्रकारचे द्वेष पसरवणार्‍या पोस्ट करमुसे यांनी आपल्या वैयक्तिक अकाऊंटवरुन फेसबुक आणि ट्विटरवर अपलोड केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे, असे पोलिसांनी आपल्या समन्समध्ये म्हटले आहे. 


अनंत करमुसे पाच वर्षांपासून लक्ष्य करत होता : जितेंद्र आव्हाड
"पाच वर्षे अनंत करमुसे हा मला लक्ष्य करत असून त्याला या कामी अन्य कोण सहाय्य करत आहे का? याचा शोध घेण्यासाठी अनंत करमुसे यास सुमारे पाच वेळा समजपत्र पाठवूनही त्याने पोलिसांना सहकार्य केले नसल्याचेही या दोषारोपपत्रात पोलिसांनी नमूद केले आहे. तर, करमुसे याच्या ट्वीटमध्ये जातीद्वेष, धर्मद्वेष दिसत असून शरद पवार यांचा शरदद्दीन आणि माझा जितुद्दीन असा उल्लेख असलेले छायाचित्र समाजमाध्यमावर प्रसारित केले होते. हे सर्व पुरावे पोलिसांनी आरोपपत्रात नमूद केले आहेत", असे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. 


पोस्टनंतर करमुसेला आव्हाडांच्या बंगल्यावर बोलावून मारहाण
अनंत करमुसे याने केलेल्या अर्धनग्न फोटोच्या पोस्टनंतर करमुसे याला जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी राहत्या बंगल्यावर बोलावून मारहाण केली असल्याचा गुन्हा तेव्हा दाखल झाला होता. त्यामुळे जितेंद्र आव्हाड आणि पर्यायाने महाविकास आघडी सरकार अडचणीत आले होते. पोलिसांनी दाखल झालेल्या गुन्ह्यात कारवाई करत आव्हाड यांच्या काही कार्यकर्त्यांना अटक केली होती. तर आव्हाड यांनी स्वतः देखील न्यायालयात हजेरी लावली होती. त्याचवेळी जितेंद्र आव्हाड यांच्याकडून अनंत करमुसेवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्याच्या तपासात पाच वेळा चौकशीला बोलावून देखील करमुसे हजर राहिला नव्हता.