Thane police : आंतरराष्ट्रीय बेल्ट व मास्क रेसलींग स्पर्धेत ठाण्याच्या महिला पोलिसांना यश मिळाले आहे. 42 देशांचा सहभाग असलेल्या स्पर्धेत त्यांनी वर्चस्व गाजवलं. ठाण्यातील महिला पोलीस शीतल मल्लिकार्जुन खरटमल यांनी दोन रौप्य आणि एका कास्य पदकावर नाव कोरले. युरोपातील बाकु आझरभाईजान येथे 28 जुलै ते 3 ऑगस्ट 2022 रोजी झालेल्या आंतरराष्ट्रीय बेल्ट व मास्क रेसलींग चॅम्पिअनशिपमध्ये उझेकिस्तान, अझरभाईजान, किर्गिस्तान, पाकिस्तान, तुर्कमेनिस्तान अशा विविध देशातील स्पर्धकांशी स्पर्धा करत ठाण्यातील पोलीस नाईक शीतल मल्लिकार्जुन खरटमल यांनी आंतरराष्ट्रीय बेल्ट रेस्लींग प्रकारात कास्य पदक व मास्क रेसलिंग प्रकारात रौप्य पदक प्राप्त करून देत ठाण्याचा झेंडा सातासमुद्रापार फडकावला आहे. 


याशिवाय येथे आयोजित करण्यात आलेल्या 'नॅशनल हाईलँड फेस्टिव्हल' या अझरबैजान प्रजासत्ताक येथील युवा आणि क्रीडा मंत्रालय, जागतिक एथनोस्पोर्ट कॉन्फेडरेशन, अझरबैजान प्रजासत्ताकचे सांस्कृतिक मंत्रालय यांनी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय महोत्सव स्पर्धेत कल्चर प्रकारात भारतीय संघाला रौप्य पदक प्राप्त करून दिले आहे. विशेष म्हणजे, भारतीय संघाने भारतीय संस्कृतीचे परंपरा जपून भारतीय पोशाख परिधान करून आपल्या भारतीय संस्कृतीचे जतन करून या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला होता. 


युरोपातील बाकु आझरभाईजान येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय बेल्ट व मास्क रेसलींग चॅम्पिअनशिपमध्ये 42 देशातील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. यासाठी महाराष्ट्रतील 13 खेळाडूची सराव निवड चाचणी ऑल इंडिया ट्रॅडिशनल व्रेस्टेलिन्ग अँड पांनक्रेशन फेडरेशन या  संस्थेचे तांत्रिक अधिकारी व उपाध्यक्ष सी ए ताबोली याच्या मार्फत करण्यात आली होती. यात 55 किलो महिला वजनी गटात शीतल मल्लिकार्जुन खरटमल यांची निवड झाली होती. त्यानंतर  युरोपातील बाकु आझरभाईजान येथे 28 जुलै ते 3 ऑगस्ट 2022 रोजी झालेल्या आंतरराष्ट्रीय बेल्ट व मास्क रेसलींग चॅम्पिअनशिपमध्ये शीतल मल्लिकार्जुन खरटमल यांनी  उझेकिस्तान, अझरभाईजान, किर्गिस्तान, पाकिस्तान, तुर्कमेनिस्तान अशा विविध देशातील स्पर्धकांशी स्पर्धा करत देशाला महिला 55 किलो वजनी गटातून आंतरराष्ट्रीय बेल्ट रेस्लींग प्रकारात कास्य पदक व मास्क रेसलिंग प्रकारात रौप्य पदक प्राप्त केले आहे. 


शितल मल्लिकार्जुन खरटमल ठाणे ग्रामीण पोलीस अंमलदार असून गेली 12 वर्षे त्या सेवेत आहेत. या यशाबाबत शीतल सांगतात कि, 'अत्यंत कठीण अशा या स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर माझे मार्गदर्शक असलेल्या सी.ए. तांबोळी सर, मार्गदर्शक व प्रशिक्षक मधुकर पगडे, अमोल साठे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच माझ्या कुटुंबाचीही यात मोठा वाटा असून आई निर्मला आणि वडील मल्लिकार्जुन यांचीही मी ऋणी आहे'. 


यापूर्वी शीतल यांनी ज्युडो मार्शल गेम्समध्ये 11 वेळा देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आजवर शीतल यांनी 65 सुवर्ण, 43 रौप्य आणि 9 कास्य  पदकांची कामगिरी बजावली आहे. त्यांना आजवर टॉप 15 वुमन आयकन पुरस्कार (बंगरुळु), कोहिनुर राष्ट्रीय पुरस्कार (पुणे), सावित्रीबाई फुले पुरस्कार (मुंबई), भारत भूषण पुरस्कार (भोपाळ) अशा नाना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. खेळातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल शीतल यांना 2020 साली अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.