Kalyan : कल्याण पूर्वेकडील टाटा नाका परिसरात देशमुख होम्स कॉम्प्लेक्समधील नागरिकांना पाणी समस्या भेडसावत आहे. अनेकदा निवेदने, तक्रारी ,मोर्चा आंदोलन करून देखील ही पाणी समस्या आजही कायम आहे . कल्याण डोंबिवली महापालिका व एमआयडीसी प्रशासनाकडून नेहमीच आश्वासन दिले जातात मात्र नळाला पाणी नसते. त्यामुळे अखेर संतापलेल्या महिलांनी आज रस्त्यावर उतरत कल्याण शिळ रोड वरील टाटा पावर नाका या ठिकाणी रास्ता रोको केला. जवळपास अर्धा तास रास्ता रोको आंदोलन झाल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत आंदोलन कर्त्याना बाजूला सारले. यावेळी नागरिकांनी पाणी समस्या सुटली नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करू, असा इशारा प्रशासनाला दिलाय. माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी नागरिक पाण्यासाठी रडतोय, आंदोलन केल तर पोलिस कारवाई करतात ,पाणी समस्या मार्गी लागली नाही तर पाच ते सहा हजार नागरिक आंदोलन करतील मग आम्ही जेलला गेलो तरी चालेल, तिकडे आम्हाला पाणी पाजा असा इशारा यावेळी दिला.
कल्याण शिळ रस्त्यालगत पीसवली परिसरात देशमुख होम्स ही 40 इमारतीची सोसायटी आहे. सात ते आठ हजार नागरिक या सोसायटीत राहतात मात्र नागरिकांना पाणी समस्या भेडसावत असून कमी दाबाने होणारा पाणी पुरवठ्यामुळे पिण्याचे पाणी देखील विकत घ्यावे लागत आहे. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावं लागतंय. हा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी नागरीक आंदोलने, मोर्चा निवेदने या माध्यमातून पाणी प्रश्न सोडविण्यासाठी लढा देत आहेत. मात्र तरीही कल्याण डोंबिवली महापालिका ,एमाय डी सी प्रशासनाकडून या नागरिकाच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पहिले जात नसल्याने पाणी प्रश्न जैसे थे असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय.
यामुळेच त्रस्त नागरिकांनी प्रशासनाला रस्ता रोकोचा इशारा देत पाणी प्रश्न सोडविण्याची मागणी केली होती, मात्र यानंतर या नागरिकांना समज देत पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने आज ऐन गर्दीच्या वेळी संध्याकाळी 5 वाजता सोसायटी मधील शेकडो त्रस्त महिलांनी कल्याण शिळ रस्त्यावर टाटा पावर येथे रास्ता रोको करत वाहतूक रोखली. मिनिटाला काही हजार वाहनाची ये जा असलेल्या या रस्त्यावर तब्बल अर्धा तास वाहतूक रोखण्यात आल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. अखेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलनकर्त्यांना हटवून वाहतूक मार्गस्थ केली मात्र नागरिकाकडून कर वसूल करणाऱ्या महापालिका तसेच पाणी पुरवठ्याची जबाबदारी असलेल्या एमआयडीसीच्या कोणत्याही अधिकार्यांनी आंदोलन स्थळी येण्याचे सौजन्य देखील दाखविले नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. यावेळी माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी या परिसरात सात ते आठ हजार नागरिक राहतात या ठिकाणी अनेक वर्षांपासून पाणी समस्या आहे. पालिका, एमआयडीसी प्रशासनाकडे तक्रारी केल्या मात्र अद्याप पाणी समस्या सुटलेली नाही ,प्रशासन तीव्र आंदोलनाचा वाट पाहतेय का ,? ठाणे जिल्ह्याचे यंदा मुख्यमंत्री झालेत त्यांनी ही समस्या तातडीने लक्ष घालून मार्गी लावावी, नागरिक पाण्यासाठी रडतोय, आंदोलन केल तर पोलिस कारवाई करतात, पाणी समस्या मार्गी लागली नाही तर पाच ते सहा हजार नागरिक आंदोलन करतील मग आम्ही जेलला गेलो तरी चालेल तिकडे आम्हाला पाणी पाजा असा इशारा माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी यावेळी दिला.