ठाणे : सध्या ठाण्यातील (Thane) एक व्हिडीओमुळे चांगलीच चर्चा रंगली आहे. नो पार्किंगमध्ये (No Parking) गाडी लावल्यास ती वाहतूक विभागाकडून जप्त करण्यात येते. मग संबंधित वाहतूक विभागाच्या कार्यालयात जाऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन आपल्याला जप्त झालेली गाडी परत मिळते. पण ठाण्यामध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ठाण्यातील उपवन परिसरातून नो पार्किंगमध्ये लावलेल्या गाड्या वाहतूक विभागाच्या ज्या लोकांकडून जप्त करण्यात येत होत्या त्यांच्याकडे कोणतीही परवानगी आणि त्यांचे स्वत:चे लायसन्स नसल्याचे उघड झालं आहे. चेतन चिटणीस या एका जागरुक नागरिकाने हा संपू्र्ण प्रकार उघडीस आणला आहे. 


नेमका प्रकार काय?


शुक्रवार (18 ऑगस्ट) रोजी ठाण्यातील उपवन तलावाजवळ चुकीच्या पद्धतीने वाहने उचलत असल्याचा प्रकार चेतन चिटणीस यांच्या लक्षात आला. यावेळी वाहतूक पोलीस देखील उपस्थित होते. त्यावेळी चेतन चिटणीस यांनी ही वाहनं उचणाऱ्यांकडे त्यांची परवानगी आणि लायसन्स मागितले. तर त्यांच्याजवळ कोणत्याही प्रकारचे लायसन्स किंवा परवानगी नसल्याचं लक्षात आलं. लायसन्स घरी असल्याची सबब देखील या लोकांकडून देण्यात येत होती. त्यानंतर यावर आजूबाजूच्या लोकांनी देखील आक्षेप घेतला आणि त्या जप्त केलेल्या गाड्या सोडण्यास सांगितल्या. तसेच अशा लोकांवर कारवाई करण्याची मागणी देखील आता नागरिकांकडून करण्यात येत आहे. 


दरम्यान या लोकांकडे कोणतीही योग्य परवानगी नाही.  तरीही हे लोक गाड्या जप्त करुन  500 ते 700 रुपये नागरिकांकडून वसूल करतात असा आरोपही करण्यात आला आहे.  हा प्रकार जेव्हा घडला तेव्हा तिथे एक वाहतूक पोलीस देखील उपस्थित होते. परंतु त्यांनी देखील या लोकांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नसल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. ठाण्यातल्या या प्रकरामुळे प्रशासनाकडून वाहतुकीचे नियम मोडण्यात येत असल्याच्या चर्चा सध्या रंगू लागल्या आहेत. 


वाहतुकीचे नियम फक्त सामान्य नागरिकांसाठी?  


वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येते. परंतु सध्या त्यांच्याचकडून हे नियम मोडले जात असल्याचं ठाण्यातल्या या घटनेमुळे समोर आलं आहे. दरम्यान यावर आता पोलीस काही कारवाई करणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच लायसन्सशिवाय इतरांच्या गाड्यांना हात लावणाऱ्या या लोकांचं काय होणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. 


हेही वाचा : 


Nandkumar Nanavare: नंदू ननावरेंची पत्नीसह आत्महत्या; ठाणे गुन्हे शाखा पोलिसांकडून चार जणांना अटक