Thane News: पोलिसांनी कारवाई केल्याने निराश होऊन ठाण्यातील (Thane) एका तरुणाने आयुष्य संपवलं आहे. मनिष उतेकर या तरुणाने घेतलेल्या या निर्णयामुळे ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात हा तरुण राहत होता. गटारी अमावस्येच्या रात्री मद्यपान करुन मित्रांसोबत तो दुचाकीवरुन जात होता. एका दुचाकीवर तिघेजण असल्यामुळे पोलिसांनी या तिघांवर कारवाई केली. या कारवाईमध्ये मनिष देखील अडकला होता. या गोष्टीचा मनिषच्या मनावर विपरित परिणाम झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. 


या घटनेनंतर ठाणे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आर्मी आणि पोलीस मध्ये भरती होण्याचं स्वप्न बघणाऱ्या मनीषवर ड्रिंक एन्ड ड्राइव्ह अंतर्गत कारवाई करण्यात आली. त्यामुळे आपलं करिअर संपलं, आता पुढे काय होणार होणार या नैराश्येतून मनीषने आत्महत्या केली.    


दरम्यान आता मनिषच्या मित्रांनी आणि नातेवाईकांनी वाहतूक पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी पोलीस ठाणे देखील गाठले. सध्या मनिषच्या नातेवाईकांकडून वाहतूक पोलिसांनवर संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आता यावर पोलीस कोणती कारवाई करतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. 


'पोलिसांनी नियमांनुसारच कारवाई केली आहे'


आत्महत्येपूर्वी मनीषने एक चिठ्ठी देखील लिहून ठेवली होती. त्याने त्याची ही चिठ्ठी त्याच्या आईला पाठवली. या चिठ्ठीमध्ये मनिषने वाहतूक पोलिसांचे नाव घेतले आहे. तसेच त्यांच्यावर अनेक आरोपही त्याने केले आहेत. परंतु हे सर्व आरोप वाहतूक पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी स्विकारण्यास थेट नकार दिला आहे. तसेच वाहतूक पोलिसांनी नियमानुसारच कारवाई केली असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, एका दुचाकीवर तिघेजण जाणे हा गंभीर गुन्हा असून त्याअंतर्गतच पोलिसांनी कारवाई केल्याचं स्पष्टीकरण देखील त्यांनी दिलं आहे. 


मनिषने त्यादिवशी जास्त प्रमाणात मद्यपान केले होते. त्यानंतर तो पोलिसांना लाच देऊन तडजोड करण्याची देखील भाषा करत होता, असं देखील पोलिसांनी सांगितलं आहे. मात्र पोलिसांनी कोणतीही तडजोड करण्यास थेट नकार दिला. तसेच पोलिसांनी नियमानुसार, कारवाई केली असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. तसेच ज्या तरुणांना आर्मी अथवा पोलिसांत भरती व्हायचं आहे त्यांनी अशा प्रकारे कायदे मोडू नयेत, असं आवाहन देखील पोलिसांनी केलं आहे. तसेच मनिषच्या आत्महत्येबद्दल पोलिसांकडून हळहळ देखील व्यक्त करण्यात आली आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Goregaon-Mulund Link Road : दिलासादायक! गोरेगांव ते मुलुंड अंतर कमी होणार, जोडरस्त्याच्या अंतर्गत बोगद्याचं बांधकाम लवकरच होणार सरु