Goregaon-Mulund Link Road : मुंबईकरांसाठी (Mumbai) एक दिलासादायक बातमी आहे. ती म्हणजे गोरेगांव ते मुलुंड जोडरस्ता (Goregaon-Mulund Link Road) अंतर्गत बोगद्याचे बांधकाम लवकरच होणार सुरु होणार आहे. पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने गोरेगाव-मुलुंडजोड रस्ता हा 12.20 किलोमीटरचा प्रकल्प हाती घेतला आहे. ऑक्टोबर 2023 पासून प्रत्यक्षात या रोडच्या कामकाजाला सुरु होईल.
ऑक्टोबर 2023 पासून प्रत्यक्ष काम सुरु होणार
या अंतर्गत गोरेगाव चित्रनगरी ते मुलुंड खिंडीपाडापर्यंत जुळा भूमिगत बोगदा (प्रत्येकी 4.70) किलोमीटर अंतर आणि चित्रनगरी परिसरातील 1.6 किमी लांब पेटी बोगद्यासह बांधकामासाठी सुरु असलेली निविदा प्रक्रिया यशस्वी ठरली आहे. यामध्ये सर्वात कमी किंमतीची बोली जेकुमार-एनसीसी जेव्ही यांनी लावली आहे. सुमारे साडेचार वर्षांमध्ये हा बोगदा पूर्ण होणार असून ऑक्टोबर 2023 पासून प्रत्यक्ष काम सुरु होईल.
गोरेगाव ते मुलुंड हे अंतर कमी वेळात गाठणे शक्य होणार
मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारे सांताक्रूझ-चेंबूर, अंधेरी-घाटकोपर, जोगेश्वरी-विक्रोळी हे तीन जोडरस्ते आहेत. मात्र दोन्ही उपनगरांमधील वाढती लोकसंख्या, वाहनांची वर्दळ लक्षात घेता, गोरेगाव-मुलुंड हा चौथा जोडरस्ता बांधण्याचा प्रकल्प मुंबई महापालिकेने हाती घेतला आहे. सुमारे 12.20 किलोमीटरच्या या रस्त्यामुळे गोरेगाव ते मुलुंड हे अंतर अत्यंत कमी वेळात गाठणे शक्य होणार आहे. तसेच, मोठ्या प्रमाणात इंधन बचत होणार आहे, असा दावा पालिकेने केला आहे.
गोरेगांव-मुलुंड जोडरस्ता अंतर्गत जुळा बोगदा बांधकामासाठी आंतरराष्ट्रीय निविदा प्रकाशित केल्या होत्या. पैकी जेकुमार-एनसीसी जेव्ही, एल ऍण्ड टी आणि ऍफकॉन्स या तीन कंपन्या अंतिम स्पर्धेत होत्या. यातील जेकुमार-एनसीसी जेव्ही यांनी सर्वात कमी किंमतीची बोली लावली आहे. ही बोली 6 हजार 301 कोटी रुपयांची आहे. बोगद्याची निर्मितीचे काम देखील आता लवकरात लवकर सुरु करण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिली आहे.
हा बोगदा पूर्णपणे पर्यावरणपूरक
एकमेकांना समांतर असे हे जुळे बोगदे प्रत्येकी 4.70 किलोमीटरचे असतील. संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्य परिसरात त्याचा अंतर्गत व्यास 13 मीटरचा असेल. हा बोगदा अभयारण्याच्या डोंगराच्या खाली पूर्णपणे जमिनीखालून जाणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हा बोगदा पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे. कारण संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्यातील वन्यजीवन, जलाशय, वृक्षसंपदा यांना कोणतीही बाधा पोहोचणार नाही. कोणतेही भूसंपादन करावे लागणार नाही. या बोगद्यामध्ये हवा खेळती ठेवण्यासाठी यंत्रणा, आग प्रतिबंधात्मक अद्ययावत यंत्रणा, तसेच पाणीपुरवठा, पर्जन्य जलवाहिन्या आणि इतर संस्थांच्या वाहिन्याही विकसित करण्यात येतील. हा संपूर्ण बोगदा टनेल बोअरिंग मशीन (टीबीएम) च्या माध्यमातून खणला जाईल. या प्रकल्पासाठी पर्यावरणीय आणि वन विभागाच्या सर्व आवश्यक त्या परवानग्या मिळाल्या आहेत. त्यामुळे बोगद्याची निविदा फलद्रूप होणे, हे प्रशासनाच्या दृष्टीने अतिशय समाधानकारक बाब आहे
महत्त्वाच्या बातम्या: