Thane Latest News : रस्त्याअभावी डोलीतून नेण्यात आलेल्या गर्भवती महिलेस आरोग्य सेवा उपलब्ध न झाल्याने तिला आपल्या जुळ्या बालकांचा डोळ्यादेखत मृत्यू पहावा लागल्याची धक्कादायक घटना पालघर जिल्ह्यात गेल्याच महिन्यात घडली. त्यापाठोपाठ आता मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातही अशीच भयंकर घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील धरणीचा पाडा येथे घडली आहे. पाड्यातील एका गर्भवती महिलेला प्रसूती वेदना होत असल्याने रस्त्याअभावी गावकऱ्यांनी तिला चादरीच्या झोळीत टाकून आरोग्य केंद्रापर्यत आणण्याचा प्रयत्न केला. पण वाटेतच झोळीमध्ये तिची प्रसूती झाली. आणि तिच्या डोळ्यादेखत तिचे मुलं झोळीतच दगावल्याने त्या मातेचं काळीज हेलावून गेलं. दर्शना महादू परले असे बाळ दगावलेल्या मातेचे नाव आहे.
भिवंडी तालुक्यातील दिघाशी ग्रामपंचायत हद्दीतील धरणीचा पाडा येथील दर्शना परले या गर्भवती महिलेस एक सप्टेंबर रोजी प्रसूती वेदना होऊ लागल्या. वेदना असह्य झाल्याने तिला प्रसुतसाठी दिघाशी येथील एक किलोमीटर अंतरावर असलेल्या आरोग्य केंद्रात गावकरी निघाले होते. मात्र रस्त्याअभावी झोळीत टाकून जंगलातून तसेच पाण्याच्या ओढ्यातून वाट काढत पायपीट करत असतानाच, वाटेतच झोळीमध्ये तिची प्रसुती झाली. मात्र आरोग्य सेवा उपलब्ध नसल्याने, तातडीने उपचार मिळाले नाही. त्यामुळे, झोळीतच या मातेच्या डोळ्यादेखत बाळाचा मृत्यू झाला. आपल्या डोळ्यासमोर दर्शनाला आपल्या मुलाचा मृत्यू पहावा लागला, हे शासकीय यंत्रणेचे अपयश आणि दुर्दैव म्हणावं लागेल.
यापूर्वी गेल्यावर्षी २२ सप्टेंबर रोजी अशीच घटना घडल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. दरवेळेस मुख्य रस्त्यापर्यंत रुग्ण, गरोदर मातांना एक किलोमीटर पायपीट करत शासकीय दवाखान्यात दाखल केले जाते. खळबळजनक बाब म्हणजे घटना घडून 24 तास उलटून गेले. मात्र कुठल्याही शासकीय यंत्रणेसह लोकप्रतिनिंधीनी वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी या महिलेच्या कुटूंबाची भेट घेतली नसल्याने गावकरी संताप व्यक्त करीत आहेत. धरणीचा पाडा येथे जाण्यासाठी रस्ता नसल्याने, तातडीने आरोग्य सेवा मिळत नाही. त्यामुळे, या भागात नागरिकांना मृत्यूला सामोरे जावे लागत आहे.
दर्शनाला आरोग्य सेवा मिळविण्यासाठी एक किलोमीटर चादरीच्या झोळीतून पायपीट करत जंगल तसेच पाण्याच्या ओढ्यातून वाट काढत दवाखाना गाठायचा होता. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही मुखमंत्र्यांच्या जिल्ह्यातील भिवंडी व शहापूर तालुक्यात अनेक गावपाड्यात आजही रस्ते, वीज, पाणी आणि आरोग्य यासारख्या प्राथमिक सुविधा आदिवासींना मिळालेल्या नाहीत. आजही येथील आदिवासींना रस्त्याअभावी डोलीकरून पायपीट करत दवाखान्यात जावे लागते आहे. तर वेळेत आरोग्य सेवा न मिळाल्याने प्राण गमवावे लागत आहे. राज्य शासनाचा कोट्यावधी रुपयांचा निधी मिळून सुद्धा आजही हा भाग विकासापासून कोसो दूर असून राज्य शासनासह लोकप्रतिनिधींनी या मूलभूत सुविधांकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.
विशेष म्हणजे रस्ताच्या मागणीसाठी अनेक वर्षापासून गावकरी वारंवार शासकीय अधिकाऱ्याकडे मागणी करीत आहे. मात्र त्यांच्या मागणीची अद्यापही स्थानिक शासकीय यंत्रणेने दखल घेतली नसल्याने अश्या दुर्घटना घडत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. शिवाय रुग्ण सेवा मिळावी म्हणून या भागातील गावपाड्यासाठी आरोग्य पथक अथवा रेस्क्यू कॅम्प स्थापन करण्यात यावा, अशी मागणी गावातील जागृत नागरिक आदेश रायात यांनी केली आहे.