Shrikant Eknath Shinde : सणांच्या काळात पक्षभेद विसरून एकमेकांच्या घरी जाण्याची महाराष्ट्राची परंपरा असून त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे काल राज ठाकरे यांच्या घरी गेले होते,अशी प्रतिक्रिया खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तर आमच्याकडे युवकांची फौज असून एकनाथ शिंदे साहेब तळागाळातून आलेल्या युवकांवर जबाबदारी देतील, असं म्हणत त्यांनी युवासेना प्रमुखपद आपण स्वीकारणार नसल्याचे संकेत दिले आहेत.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी गेले होते. त्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या काही नेत्यांनीही राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे यामागे काही नवीन समीकरण जुळण्याची शक्यता आहे का? असं श्रीकांत शिंदे यांना विचारलं असता, राज ठाकरेंकडे दीड दिवसांचा गणेशोत्सव होता. त्यामुळे सगळेच नेते तिकडे जाऊन दर्शन घेत होते. महाराष्ट्राला एक वेगळी परंपरा आहे, की सणांच्या वेळेस कुठलाही पक्षभेद न ठेवता आपण जसे आपल्या नातेवाईकांकडे जात असतो, तसंच वेगवेगळ्या पक्षाचे नेते एकमेकांच्या घरी उत्सव साजरा करण्यासाठी जात असतात. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल राज ठाकरेंकडे गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गेले होते, अशी प्रतिक्रिया श्रीकांत शिंदे यांनी दिली. तर युवासेनेचं प्रमुखपद आपण घेणार असल्याच्या चर्चा सुरू असल्याबद्दल श्रीकांत शिंदे यांना विचारलं असता, आज शिंदे साहेबांसोबत बहुतेक शिवसैनिक, पदाधिकारी, आमदार, खासदार आहेत. त्याचबरोबर युवासेनेमधील युवक मोठ्या प्रमाणात समर्थन देत असून त्यांच्याबरोबर जोडले गेले आहेत. 


आपल्याकडे चांगल्या युवकांची फौज आहे. ही फौज येणाऱ्या काळामध्ये युवकांचे प्रश्न पुढे घेऊन जाण्यासाठी काम करेल. तळागळातून आलेल्या युवकांवर आम्ही आणि शिंदे साहेब नक्कीच जबाबदारी टाकतील, त्यांच्या माध्यमातून युवकांचे प्रश्न सोडवून पुढे जाण्याचं काम होईल, असं श्रीकांत शिंदे म्हणाले. त्यामुळं युवासेनेचं प्रमुखपद स्वीकारणार नसल्याचे संकेत श्रीकांत शिंदे यांनी दिल्याचं बोललं जातं आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गेले दोन दिवस गणेश दर्शनाच्या निमित्तानं वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांच्या घरी जाऊन गाठीभेटी घेतायत. त्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरु आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी काल राज ठाकरे, मनोहर जोशी आणि मिलिंद नार्वेकरांच्या घरी जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं. त्यानंतर आज ते नारायण राणे यांच्या घरी दर्शनासाठी गेले होते.