ठाणे: कळव्यात एकाच दिवसात 18 रुग्णांचा जीव गेल्यानंतर आता जिल्हा रुग्णालयावरील भार कमी करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असून त्याचाच एक भाग म्हणून भिवंडीत अत्याधुनिक रुग्णालय उभारण्यात येणार आहे. भिवंडीत 200 खाटांचे बाल आरोग्य केंद्र उभारण्याला मंजुरी मिळाल्याचं केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितलं.
ठाणे: जिल्हा रुग्णालयावर ताण पडल्यामुळे ठाणे जिल्ह्यातील कळवा रुग्णालयात एकाच दिवशी 18 रुग्णांनी आपले प्राण गमावले होते. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील रुग्णालयावरील ताण कमी करण्यासाठी भिवंडीत केंद्र शासनाच्या वतीने अद्यावत सुविधांनी सुसज्ज 200 खाटांचे माता बाल आरोग्य केंद्र रुग्णालयास मान्यता मिळाली आहे. त्यासाठी 58 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून त्याची आढावा बैठक घेण्यात आली होती.
या आर्थिक वर्षात रुग्णालयाच्या उभारणीसाठी 5 कोटी रुपये संबंधित आरोग्य विभागाच्या कार्यालयात जमा झाले आहेत. त्यामुळे राज्यातील पहिले 200 खाटांचे माता बाल आरोग्य केंद्र भिवंडीत उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रुग्णालय बांधणीची प्रक्रिया सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लवकरच सुरू होणार असून या रुग्णालयासाठी महापालिका प्रशासनाकडून 2021 मध्ये केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता.
केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी देखील त्यासाठी पाठपुरावा केला होता. या रुग्णालयात महिलांच्या प्रसूती पूर्व तपासणी, प्रसूती आणि प्रसूती पश्चात मातांच्या आरोग्याची काळजी घेण्यासोबतच नवजात बालकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे. शस्त्रक्रिया विभाग, अतिदक्षता विभाग, लहान बाळांसाठी अतिदक्षता विभाग, रक्त चाचणी, रक्तपेढी अशा सुविधा या रुग्णालयात उपलब्ध होणार आहेत.
भिवंडी या यंत्रमाग उद्योग नगरीत कामगार आणि मजूर वर्गाची संख्या मोठ्या प्रमाणात असून आजही सुमारे 70 टक्के लोकसंख्या झोपडपट्टी क्षेत्रात राहत आहे. त्यामुळे आरोग्य सुविधांसाठी शहरातील सरकारी रुग्णालयांवर या वर्गाची भिस्त मोठी आहे. परंतु शहरात पालिकेच्या मालकीचे रुग्णालय नसल्याने स्व. इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयावर आरोग्य यंत्रणांचा ताण वाढत आहे. या रुग्णालयात वाडा, शहापूर, भिवंडी शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांना अनेक वेळा प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना ठाणे, मुंबईला पाठविण्यात येत असते. त्यामुळे रुग्णांची प्रचंड गैरसोय होत असते. त्यामुळे भिवंडीत मंजूर झालेल्या या 200 खाटांच्या माता आणि बाल आरोग्य केंद्र रुग्णालयाचा फायदा येथील गरीब तसेच गरजू महिलांना निश्चितच होणार आहे.
ही बातमी वाचा: