ठाणे : रुग्णालयात दैनंदिन विविध उपचारांसाठी रुग्ण येत असून सद्यस्थितीत रुग्णांची संख्या वाढली असली तरी दाखल करण्यायोग्य एकही रुग्ण नाकारला जाणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी सूचना ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली आहे. ते म्हणाले की, सर्वांशी सौजन्याने वागा, रुग्णांना उपचार मिळण्यात कोणतीही हयगय होता कामा नये. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात काम करणाऱ्या सर्व विभाग कर्मचारी, अधिकारी यांनी समन्वय साधून आरोग्य सेवा, रुग्ण सेवा हेच सर्वांनी सर्वोच्च प्राधान्य ठेवले पाहिजे, असेही बांगर म्हणाले. आज ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी कळव्याच्या छत्रपती शिवाजी रुग्णालयात आयोजित केलेल्या आढावा बैठकीत सर्व विभागप्रमुखांना सूचना दिल्या. कर्मचारी, नर्स, औषध पुरवठा, सुरक्षा यंत्रणा, यंत्रसामग्री या सगळ्याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. तसेच काही प्रशासकीय बदल करण्यात आले.


आज ठाणे मनपा मुख्यालयातील झेंडावंदन कार्यक्रमानंतर  छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आयुक्तांनी बैठक घेतली. सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयास भेट दिली होती, यावेळी त्यांनी दिलेल्या सूचनांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली.  रुग्णालयात ठाण्यासह आजूबाजूच्या महानगरपालिका तसेच ग्रामीण भागातील रुग्ण हे उपचारासाठी येत असतात, कोणत्याही परिस्थितीत येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला उपचार मिळतील याबाबतची काळजी सर्व विभागप्रमुखांनी घ्यावी. रुग्णाला वेळेवर उपचार मिळावेत यासाठी रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय, शिफ्टनुसार बदलणारा कर्मचारी वर्ग यांनी वेळेवेर उपस्थित राहण्याच्या सूचनाही आयुक्त्‍ अभिजीत बांगर यांनी यावेळी दिल्या.


प्रत्येक विभागाच्या रुग्णकक्षामध्ये काटेकोर शिस्तीचे पालन होईल हे पाहण्यासाठी संबंधित विभागप्रमुख जबाबदार राहतील – आयुक्तांच्या सूचना


वॉर्डमधील नर्सेसची ज्युनिअर तसेच रेसीडन्स डॉक्टरांची उपस्थिती ऑन कॉल वैद्यकीय अधिकारी यांची कर्तव्य कालावधीतील संपूर्ण रुग्णालयातील उपस्थिती, बाह्यरुग्ण विभागात वरिष्ठ विशेष तज्ज्ञ यांची उपस्थिती, रुग्णकक्षातील रुग्णांचे व्यवस्थापन तसेच दिली जाणारी उपचार पध्दती यांबाबत स्वत: विभागप्रमुख जबाबदार राहतील अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. त्याचप्रमाणे दिवसातून दोन पेक्षा जास्त वेळा विभागप्रमुख स्वत: प्रत्येक रुग्ण्कक्षेमध्ये राऊंड घेतील व रुग्णाची परिस्थिती तपासून आवश्यकतेनुसार आवश्यक ती कार्यवाही करतील अशा सूचना आयुक्त अभिजीत बांगर यांनी बैठकीत दिल्या. या व्यतिरिक्त्‍ अधिष्ठाता यांनी स्वत: त्यांच्या स्वत:च्या विभागाव्यतिरिक्त्‍ दररोज किमान दोन विभागांच्या रुग्ण्कक्षामध्ये राऊंड घेणे बंधनकारक राहील अशाही सूचना यावेळी देण्यात आल्या. अधिष्ठाता यांनी हॉस्टेल, लॉण्ड्री, कॅन्टीन, भोजनगृह या ठिकाणी वेळोवळी भेट दिली जाईल याची दक्षता घ्यावी.


प्रशासकीय कामकाजात बदल


छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या प्रशासकीय कामकाजात देखील आयुक्तांनी बदल केले असून नवीन कार्यालयीन अधीक्षक व लिपिकांची नेमणूक करण्यात आली.  सदर अधिकाऱ्यांनाही कामकाजाबाबत सूचना करण्यात आल्या. यापुढे मुख्यालयाला सादर करण्यात येणारे प्रस्ताव व इतर सर्व प्रशासकीय कामे ही वैद्यकीय अधिष्ठाता व डॉक्टर्स यांनी न करता सर्व कामे ही कार्यालयीन अधीक्षकांच्या मार्फत केली जातील. रुग्णालयाचे अधिष्ठाता व वैद्यकीय अधीक्षक यांनी फक्त रुग्णसेवेशी संबंधित कामकाजावर लक्ष ठेवून त्यामध्ये सुधार होईल याकडे लक्ष द्यावे. तसेच रुग्णालयामध्ये सुरू असणारी भरती ही निरंतर प्रक्रिया असल्याने वेळोवेळी निर्माण होत असलेल्या रिक्त जागांचा आढावा घेवून भरती प्रक्रिया चालूच ठेवावी तसेच काही संवर्गातील विशेष तज्ज्ञ उपलब्ध होण्यास अडचणी येत असतील तर अतिरिक्त वेतन देवून सदर विशेष तज्ज्ञ उपलब्ध करुन घ्यावेत.


रुग्णांशी सौजन्यपूर्ण वागा


रुग्णालयात येणारा रुग्ण हा आजारांनी हतबल झालेला असतो, अशावेळी रुग्णांशी व त्यांच्या नातेवाईकांसोबत डॉक्टर्स, नर्स यांनी सौजन्याची वागणूक ठेवण्याचा सल्लाही यावेळी आयुक्त्‍ अभिजीत बांगर यांनी दिला. त्याचबरोबर रुग्णालयात असलेल्या सुरक्षारक्षकांनी देखील रुगणालयात येणाऱ्या रुग्णांशी नीट वागावे. रुग्णालयात शिस्तीचे वातावरण असावे. तसेच डॉक्टरांना त्यांना असलेल्या अडचणीबाबत थेट मला संपर्क करावा असे सांगून आयुक्तांनी आपला भ्रमणध्वनीक्रमांक सर्व विभागप्रमुखांना शेअर केला.