ठाणे : देशभरात आज 77 वा स्वातंत्र्यदिन (Independence Day) साजरा केला जात आहे. ठिकठिकाणी आज सकाळी विविध नेत्यांच्या, मान्यवराच्या हस्ते ध्वजारोहण झालं. मात्र ठाण्यात शिवसेना ठाकरे गटाने मध्यरात्रीच ध्वजारोहण केलं. सोबतच शिवसेनेच्या (Shinde Group) वतीनेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यातील जिल्हा शाखा इथे पारंपारिक ध्वजारोहण पार पडले. धर्मवीर आनंद दिघे यांनी 1976 साली मध्यरात्री ध्वजारोहण करण्याची परंपरा सुरु केली. आता शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाण्यात आता दोन ठिकाणी ध्वारोहणाचा कार्यक्रम पार पडतो. याशिवाय मनसेने मुलुंड इथे रात्री ध्वजारोहण केलं. शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं.


ठाकरे गटाकडून ठाण्यातील चंदनवाडीत मध्यरात्री ध्वजारोहण


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ठाण्यातील चंदनवाडी परिसरातील शिवसेना शाखेजवळ मध्यरात्री म्हणजे रात्री 12 वाजता ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी जय जवान,जय किसान, अमर जवान, अमर ज्योत, तयार करण्यात आल्या असून प्रथम शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर अमर ज्योत प्रज्वलित करुन 12 वाजून 01 मिनिटांनी निवृत्त पोलीस आयुक्त के पी रघुवंशी यांच्या हस्ते धवजारोहण कारण्यात आलं. यावेळी चंदनवाडी परिसरातून मशाल यात्रा देखील काढण्यात आली. ज्यामध्ये शेकडोच्या संख्येने नागरिक तसेच कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले होते. अनेक ठिकाणावरून मशालयात्रा निघत होती. भारत माता की जय नावाचा जयघोष तसंच संपूर्ण परिसर तिरंगामय झाला होता. तसेच या कार्यक्रमात शहीद जवानांच्या कुटुंबियांना सन्मानित करण्यात आलं तर जवानांचे सत्कार देखील करण्यात आले. धर्मवीर आनंद दिघे यांच्या संकल्पनेतून सुरु झालेला स्वातंत्र्यदिन सोहळ्याची परंपरा खासदार राजन विचारे यांनी कायम ठेवली.




धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरु केली परंपरा


मध्यरात्री ध्वजारोहण करण्याची सुरुवात धर्मवीर आनंद दिघे यांनी ठाण्यातील जिल्हा कर्यालयापासून केली होती. मात्र शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाण्यात आता दोन ठिकाणी ध्वारोहणाचा कार्यक्रम पार पडत आहे. "गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी, ब्रिटिशांचा ध्वज निश्चित किती तारखेला? किती वाजता खाली उतरला आणि हिंदूस्थानचा ध्वज किती वाजता फडकला याचा अभ्यास करुन 1974 ते 75 पासून शिवसेनेच्या वतीने दरवर्षी 14 ऑगस्टच्या रात्री 12.01 वाजता ध्वजारोहण करण्याचा निर्णय घेतला. या नाविन्यपूर्ण ध्वजारोहण सोहळ्यास संपूर्ण ठाणेकरांनी उचलून धरले. दिघे साहेबांच्या कल्पकतेचे कौतुक झाले. तेव्हापासून दरवर्षी 14 ऑगस्टला मध्यरात्री दिमाखदार ध्वजारोहण सोहळा साजरा झाला. ती रात्र म्हणजे नवचैतन्य, स्फूर्तीदायक, प्रेरणादायक याचा त्रिवेणी संगम! तो संपूर्ण रोमांचकारी 10 ते 15 मिनिटांचा सोहळा पार पडत असताना प्रत्येकाच्या अंगात देशभक्ती संचारते. रोमांच उभे राहतात. राष्ट्र भक्ती, देश प्रेम जागृत होते एकूणच हा सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा डोळ्यात पाणी आणणारा होता. धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरु केलेली परंपरा तसंच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा आम्ही पुढे नेत आहे," असं खासदार राजन विचारे यांनी सांगितलं.


मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ठाण्यातील जिल्हा शाखेत पारंपारिक ध्वजारोहण


भारताच्या 77 व्या स्वातंत्र्यदिनाच्या आदल्या रात्री ठाण्यात पारंपारिक पद्धतीने चालणाऱ्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. धर्मवीर आनंद दिघे यांनी 1976 पासून ही परंपरा सुरु केलेले असून या ठिकाणी ठाण्यातील मध्यवर्ती असलेल्या शाखेमध्ये हा कार्यक्रम ध्वजारोहणाचा पार पडला. यावेळी अमरदीप मशाल पेटवली. यावेळी टी.डी.आर.एफ  जवानांचा सत्कार करण्यात आला तसेच आमदार रवींद्र फाटक यांचा वाढदिवस देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. याच शाखेमध्ये गेल्यावर्षी ठाकरे गट आणि शिंदे गटांमध्ये वाद पाहायला मिळाला होता. त्यानंतर या वर्षीचा हा कार्यक्रम राजन विचारे यांनी चंदनवाडी इथे घेतला. तर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा कार्यक्रम पारंपारिक पद्धतीने ठाण्यातील मध्यवर्ती जिल्हा शाखेमध्ये करण्यात आले.




मुलुंडमध्ये मनसेच्या वतीने मध्यरात्री ध्वजारोहण


मुलुंड येथील मेहुल सर्कल या ठिकाणी मनसेचे विभाग अध्यक्ष राजेश चव्हाण यांच्या वतीने रात्री 12 वाजता स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी इस्रोच्या चांद्रयान मोहिमेची हुबेहूब आणि भव्य अशी प्रतिमा साकारण्यात आली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते इथे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुलुंडमधील रहिवाशी आणि मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. "रात्रीचे 12 वाजले आहेत तरी मोठ्या उत्साहात लोक आले आहेत. द्रौपदीच्या साडीवर तेव्हाही हात टाकला जात होता आणि आताही हात टाकला जात आहे. ही दुःखाची बाब आहे. सरकारने कृष्णाची भूमिका लवकर घेतली पाहिजे, महिलांवरील अत्याचार थांबवले पाहिजे," अशी प्रतिक्रिया शर्मिला ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली. 


ब्रिटीश राजवट संपुष्टात आली आणि भारत स्वतंत्र झाला


15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटीश राजवट संपुष्टात आली आणि भारताला स्वातंत्र्य मिळालं. त्यावेळी लॉर्ड माऊंटबॅटन यांनी भारत स्वतंत्र झाल्याची घोषणा केली. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी 14 ऑगस्ट 1947 रोजी मध्यरात्री देशाला उद्देशून जे भाषण दिलं त्याला 'द ट्रिस्ट विद डेस्टिनी' (नियतीशी करार) असं म्हटलं जातं. 


हेही वाचा