ठाणे: डोंबिवलीतील (Kalyan Dombivli Loksabha) भाजपा पदाधिकाऱ्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजपाने शिंदे गटाचे काम करणार नसल्याचा ठराव पास केला होता. हा वाद केंद्रापर्यंत पोहोचला. जोपर्यंत मानपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांची बदली होत नाही तोपर्यंत शिवसेनेला सहकार्य करायचे नाही असा ठराव भाजपाने केला होता. यानंतर राज्यामध्ये कुरघोडीचे राजकारण रंगले होते. या वादावर पडदा पडताच खासदार श्रीकांत शिंदे सक्रिय झाले आहेत.


श्रीकांत शिंदे यांनी कल्याण भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांचा मार्गदर्शन मेळावा आयोजित केला आहे. हा मेळावा शनिवारी सकाळी दहा वाजता कल्याण मधील आचार्य अत्रे सभागृहामध्ये संपन्न होणार आहे. या वादा नंतर पुन्हा श्रीकांत शिंदे कल्याण लोकसभेमध्ये सक्रिय झालेले दिसून येतील असं सांगण्यात येतंय.


वादावर पडदा 


खासदार श्रीकांत शिंदे प्रतिनिधीत्व करत असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात वादाची ठिणगी पडली. भाजपने या लोकसभा मतदारसंघावर दावा केला. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटाविरोधात उघड भूमिका घेत कोणतेही सहकार्य करणार नसल्याचा ठराव केला. भाजपच्या एका स्थानिक पदाधिकाऱ्याविरोधात जाणीवपूर्वक विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केला असल्याचा दावा भाजपने केला. 
 
कल्याणमधील या वादावर पडदा पाडण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठका घेतल्या. पालघरमध्ये 'शासन आपल्या दारी' कार्यक्रम पार पाडल्यानंतर राज्याचे मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासोबत बैठक घेतली. पालघरमधील कार्यक्रम संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रविंद्र चव्हाण यांच्यासोबत ग्रीन रुममध्ये चर्चा झाली. या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघाच्या वादावर नाराजी व्यक्त केली. उपमुख्यमंत्र्यांनी संयमी भूमिका घेत आपण एकत्र आहोत, एकत्रित काम करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. एकमेकांविरोधात वाद निर्माण करण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केले.


Shrikant Shinde: काय आहे प्रकरण? 


डोंबिवलीत (Kalyan Dombivli Latest News) एका भाजप पदाधिकाऱ्यावर त्यांच्याच पक्षाच्या महिला कार्यकर्तीकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामागे शिवसेनेतील शिंदे गटाचा हात असल्याचा आरोप करत भाजपने डोंबिवलीत मोर्चा काढला. तसेच यापुढे शिंदे गटाला सहकार्य करणार नसल्याचा ठराव स्थानिक कार्यकर्त्यांनी केला. त्यावरुन आता शिवसेना आणि भाजपमध्ये वाद निर्माण झाला होता. 


नेमक्या याच कारणामुळे संतापलेल्या श्रीकांत शिंदेंनी थेट आपल्या खासदारकीचा राजीनामा देण्याचा इशारा दिला होता. शिवसेना-भाजपच्या युतीत क्षुल्लक कारणांसाठी मिठाचा खडा टाकण्याचं स्वार्थी राजकारण डोंबिवलीतल्या काही नेत्यांकडून सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.



ही बातमी वाचा: