ठाणे: इराणी गँगच्या 24 वर्षीय मोरक्याला मानपाडा गुन्हे शाखेच्या पथकाला शहाड परिसरात सापळा रचून अटक करण्यात यश आले आहे. या सराईत गँगच्या मोरक्यावर 21 गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर आले असून 13 गुन्ह्यातील लाखोंचा मुद्देमाल मानपाडा पोलिसांनी हस्तगत केला आहे. मुस्तफा उर्फ मुस्सू जाफर सैयद उर्फ इराणी, (वय 24, रा.  आंबिवली, इराणी वस्ती) असे अटक केलेल्या गँगच्या मोरक्याचे नाव आहे.  


जिल्ह्यातील सर्वात मोठी इराणी वस्ती कल्याण - कसारा रेल्वे मार्गावरील आंबिवली रेल्वे स्थानकाला लागूनच असून या इराणी वस्तीतून आतापर्यत  शेकडो इराणी गुन्हेगारांना पोलिसांनी विविध गुन्ह्यात अटक केली आहे. मात्र तरीही इराणी वस्तीत आजही गुन्हेगारांचा वावर असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात दुचाकी चोरी, धूमस्टाईलने सोनसाखळी, मोबाईल आणि घरफोडी करण्यात पटाईत असलेल्या इराणी गँगच्या मोरक्यासह त्याच्या साथीदारांनी नागरिकांचे धूम स्टाईलने सोनसाखळी, मोबाईल पळविण्याचा सपाट लावला होता. त्यातच  मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील  भोपर रोड नांदीवली पूर्व येथे  राहणारे शरद पुंडलीक कडुकर हे 3 जून 2023 रोजी सकाळी 7 वाजल्याच्या  सुमारास भोपर कमाणी जवळी पायी  जात असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरटयांनी पाठीमागे येवून त्यांच्या  हातातील महागडा  मोबाईल जबरदस्तीने खेचून धूम स्टाईलने पळवून नेला.


या घटनेनंतर  मानपाडा पोलीस ठाण्यांत कडूकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भादवि कलम 392, 34 प्रमाणे अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यांत आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या वेगवेगळ्या टिम तयार करण्यात आल्या. या गुन्हयांतील आरोपींचा शोध सुरु करून सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून  शोध घेतला जात असतानाच, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश वनवे आणि  सुनिल तारमळे यांना एक गुप्त बातमी मिळाली. त्यावरून त्यांनी पथकासह कल्याण पश्चिम भागातील शहाड  भागात सापळा रचला होता. त्यावेळी  एक इसम दुचाकी  घेण्यासाठी शहाड रेल्वे स्टेशन परिसरात आला असता त्यांचा संशय आल्याने त्याच्यवर झडप घालून  जागीच पकडले. त्यानंतर  त्याच्याकडे  विचारपूस केली असता त्याने पोलीस पथकाला गुन्हयांची कबुली दिली. 


शिवाय मानपाडा, कळवा, शिवाजीनगर, मध्यवर्ती, नारपोली, कोळसेवाडी या विविध पोलीस ठाण्याच्या  हद्दीत मुस्तफा उर्फ मुस्सू जाफर सैयद उर्फ इराणी याने साथीदाराच्या  मदतीने चेन स्नॅचिंग, मोबाइल स्नॅचिंग, मोटार सायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. अटक सराईत मोरक्या कडुन 60 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 8 दुचाक्या, 5 महागडे मोबाईल फोन असा एकूण 4 लाख 25, हजार रुपये  किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यांत आलेला आहे. तर अटक मोरक्याच्या  साथीदारांचा  शोध घेण्यात येत असल्याची माहिती  सहाय्यक पोलीस आयुक्त  सुनिल कु-हाडे यांनी दिली आहे. विशेष म्हणजे  अटक इराणी गँगच्या मोरक्यावर  यापूर्वी 21 गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहेत


ही बातमी वाचा: