ठाणे : मराठी पाट्यावरून (Marathi Patya) मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) आक्रमक भूमिका घेतल्याने या आधीच अनेक दुकानांवर पुन्हा मराठी नावे दिसू लागली आहेत. राज ठाकरेंनी एक शब्द टाकला तर त्यांचे कार्यकर्तेही कसे कामाला लागतात आणि मराठीची मोहीम फत्ते करतात हे अनेकदा दिसून आलं. तसाच काहीसा प्रकार शहाड रेल्वे स्टेशनवर (Shahad Railway Station) दिसून आला. स्वागतासाठी थांबलेल्या राज ठाकरेंची नजर वरती गेली, त्या ठिकाणी हिंदीत शहाडचे नाव 'सहद' असं लिहिलं होतं. त्यावर हे हिंदी कशाला पाहिजे असा प्रश्न राज ठाकरेंनी केला. त्यानंतर मनसे पदाधिकारी कामाला लागले आणि त्यांनी रेल्वे प्रशासनाकडून सहद हा शब्द हटवून त्या ठिकाणी शहाड शब्द लिहून घेतला.
राज ठाकरेंची अनावश्यक असलेल्या हिंदी सहद या नावावर नजर पडली आणि नंतर रेल्वे प्रशासनाला तो शब्द हटवावा लागला. आता शहाड हाच शब्द सर्वत्र दिसून येतोय.
नेमकं काय घडलं?
शुक्रवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे कल्याण आणि अंबरनाथ दौऱ्यावर होते. अंबरनाथहून कल्याणच्या दिशेने येत असताना शहाड रेल्वे स्टेशन समोर मनसेचे काही पदाधिकारी त्यांच्या स्वागतासाठी थांबले होते. राज ठाकरेंची शहाड रेल्वे स्टेशन समोर गाडी आली.
राज ठाकरे गाडीतून उतरताच मनसे पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केलं. याच दरम्यान राज ठाकरे यांची नजर शहाड रेल्वे स्टेशनच्या वरच्या भागावर पडली. त्या ठिकाणी मराठीत शहाड आणि हिंदीत 'सहद' असे लिहिले होते. राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना विचारले हा काय प्रकार आहे? कार्यकर्त्यांनी सांगितले की रेल्वे स्टेशनवर मराठीत शहाड लिहितात आणि हिंदीमध्ये सहद लिहितात.
हिंदी कशाला पाहिजे?
त्यावर हिंदी कशाला पाहिजे? असा प्रश्न राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना विचारला. राज ठाकरेंची ही सूचना मनसे पदाधिकाऱ्यांना लगेच लक्षात आली. हिंदी सहद काढून टाकू असा शब्द पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांना दिला आणि राज ठाकरे गाडीतून बसून रवाना झाले.
राज ठाकरेंच्या आक्षेपानंतर मनसे पदाधिकारी बंडू देशमुख यांनी शहाड रेल्वे स्थानकात जाऊन रेल्वे स्टेशन प्रबंधकाला निवेदन दिले. सहद हा हिंदी शब्द येत्या दोन दिवसांत हटवण्यासाठी त्यांनी अल्टिमेटम दिला. मनसेच्या या दणक्यानंतर अखेर रेल्वे प्रशासनाने नरमाईची भूमिका घेतली. रेल्वे प्रशासनाने हिंदीत लिहिलेला सहद हा शब्द काढून त्या ठिकाणी मराठीत शहाड शब्द लिहिला आहे. रेल्वे स्टेशनवर आवश्यक त्या सर्व ठिकाणी हे बदल करण्यात आले.