ठाणे : कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नोकर भरती मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. ही भरती बेकायदेशीरपणे करण्यात आली असल्याचा गंभीर आरोप माजी संचालक मयूर पाटील यांनी केला आहे. नोकर भरती करताना फक्त बाजार समितीमधील आजी माजी संचालक आणि अधिकारी वर्गाच्या नातेवाईकांना भरती करुन घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मयूर पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर येत्या 24 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
कल्याण एपीएमसी बाजार समितीत 37 जणांची नोकर भरती करण्यात आली आहे. त्यासाठी 7 ते 8 हजार जणांनी अर्ज भरले होते. त्याची परीक्षा झाल्यावर त्यातून 55 जणांची प्रत्यक्ष मुलाखतीसाठी निवड झाली. त्यापैकी 37 जणांची भरती करण्यात आली. या भरती प्रक्रियेचा ठराव जेव्हा मांडला गेला. त्याच वेळी ही भरती प्रक्रिया नियम आणि अटी शर्तींनी धरुन नाही या कारणास्तव माजी संचालक मयूर पाटील यांनी तीव्र विरोध केला होता.
या प्रकरणी त्यांनी संबंधित विभागाकडे तक्रारही केली होती. मात्र बेकायदेशीर भरती प्रक्रियेचा मार्ग सुकर होण्याकरीता डीडीआरकडे आस्थापना खर्च 45 टक्के दाखविण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. वास्तविक बाजार समितीचा आस्थापना खर्च 50 टक्के होता. या प्रकरणात दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप आहे.
भरती प्रक्रियेसाठी जी एजेन्सी नेमली गेली, त्याची प्रक्रियाही योग्य प्रकारे राबविली गेली नसल्याचा आरोप पाटील यांनी केला. भरती प्रक्रियेस विरोध असताना नियम आणि अटी शर्ती डावलून भरती गेली केल्याचा आरोप त्यांनी केला. संचालक मंडळास कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नसताना केवळ संचालक मंडळातील आजी माजी संचालक आणि अधिकारी वर्गाच्या नातेवाईकांची भरती करण्यसााठी बेकायदेशीरपणे भरती केली गेल्याचा आरोप आहे.
यात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. या प्रकरणी प्रशासनाकडे दाद मागूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने त्यांनी या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायालयात 24 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
ही बातमी वाचा: