अंबरनाथ, ठाणे : नंदकुमार ननावरेंनी (Nandkumar Nanavare) 1 ऑगस्टला उल्हासनगरमधील राहत्या घराच्या टेरेसवरून पत्नीसह आत्महत्या केली. या आत्महत्येला अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर (Balaji Kinikar) यांचे पीए जबाबदार असल्याचा आरोप आहे. ननावरे दाम्पत्य काही जणांच्या त्रासाला कंटाळले होते, असा उल्लेख सुसाईड नोटमध्ये आहे. साताऱ्यातील काही लोक आम्हाला मानसिक त्रास देत असल्यानं टोकाचं पाऊल उचलत असल्याचं ननावरे आत्महत्येपूर्वी म्हणाले होते, तसा व्हिडीओ त्यांनी रेकॉर्ड केला होता. आत्महत्येपूर्वीच्या व्हिडिओत खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचा उल्लेख केल्याने खळबळ उडाली आहे.


चार ते पाच जणांना अटक


धनंजय ननावरे यांच्या या व्हिडीओनंतर ठाणे क्राईम ब्रांचने तात्काळ कारवाई सुरू केली असून, उल्हासनगर तसेच अंबरनाथमधून चार ते पाच जणांना अटक केली आहे. यामध्ये विशेष म्हणजे शिवसेना आमदार बालाजी किणीकर यांचे स्वीय सहायक शशिकांत साठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते कमलेश निकम तसेच नरेश गायकवाड यांच्यासह आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे.


रणजितसिंह निंबाळकरांचंही सुसाईड नोटमध्ये नाव


आत्महत्यापूर्वीच्या व्हिडीओतखासदार रणजितसिंह निंबाळकर यांचा उल्लेख केल्याने या आत्महत्येमागे काही राजकीय खेळी तर नाही ना? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे, मात्र या प्रकरणी रणजितसिंह निंबाळकर यांचाशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान ननावरे दाम्पत्याच्या आत्महत्येचा छडा लावणं आणि आरोपींना शिक्षा व्हावी, यासाठी ठाणे गुन्हे शाखेला मोठी कसरत करावी लागणार आहे.


बोट कापल्याच्या व्हिडिओनंतर अटकसत्र सुरू


विठ्ठलवाडी पोलिसांच्या दिरंगाईमुळे या प्रकरणाचा तपास खंडणीविरोधी पथकाकडे सोपवण्यात आला होता. मात्र तरीही कारवाई न झाल्याने ननावरे यांच्या भावाने आपलं बोट कापत गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पाठवणार असल्याचा व्हिडीओ तयार केला होता. या व्हिडीओची दखल घेत तातडीने तपासाची चक्रं फिरली आणि खंडणीविरोधी पथकानं शुक्रवारी (18 ऑगस्ट) काही जणांना अटक केली. यामध्ये शिवसेना आमदार बालाजी किणीकर यांचे स्वीय सहाय्यक शशिकांत साठे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते कमलेश निकम, राष्ट्रवादीचे पदाधिकारी नरेश गायकवाड यांच्यासह अन्य काही जणांचा समावेश आहे.


आत्महत्येनंतर उल्हासनगरमध्ये खळबळ


नंदू ननावरे आणि त्यांच्या पत्नी उज्वला ननावरे या दाम्पत्याने दुपारच्या सुमारास उडी मारून आत्महत्या केली. या घटनेनंतर उल्हासनगर परिसरात खळबळ उडाली होती. नंदू ननावरे हे उल्हासनगरच्या दिवंगत आमदार ज्योती कलानी यांचे स्वीय सहाय्यक (पीए) म्हणून कार्यरत होते, मात्र ज्योती कलानी यांच्या निधनानंतर नंदू ननावरे स्थानिक राजकीय नेत्यांची मंत्रालयीन कागदपत्राची कामं हाताळत होते. 1 ऑगस्टला नंदू ननावरे आणि त्यांच्या पत्नीच्या आत्महत्येनंतर परिसरात खळबळ उडाली होती.


आत्महत्येपूर्वी ननावरे दाम्पत्याने बनवला व्हिडीओ


आत्महत्या करण्यापूर्वी नंदू ननावरे आणि त्यांच्या पत्नी उजवला ननावरे यांनी एक व्हिडिओ बनवला होता, हा व्हिडीओ त्यांच्या आत्महत्येच्या दुसऱ्याच दिवशी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओत त्यांनी आपल्या आत्महत्येचं कारण तसंच त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या व्यक्तींची नावं घेतली होती. त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, असी मागणीही दाम्पत्याने केली होती.


विठ्ठलवाडी पोलिसांवर प्रश्नचिन्ह


उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात संबंधित प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यानंतर आता हा गुन्हा ठाणे क्राईम ब्रांचकडे वर्ग करण्यात आला असून ठाणे क्राईम ब्रांच आरोपींचा शोध घेत होती. आत्महत्येच्या घटनेला साधारण 20 दिवस उलटूनही तपास संथ गतीने होत असल्याचा आरोप नंदू ननावरे यांचे भाऊ धनंजय ननावरे यांनी पोलिसांवर केला. आपल्या भावाला न्याय मिळावा, यासाठी त्यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.


अटक होत नाही तोपर्यंत शरीराचा एक भाग कापून पाठवणार


नंदू ननावरेंच्या भावाने केलेल्या व्हिडीओत त्यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे योग्य तपासाची मागणी केली असून, जोपर्यंत त्यांच्या भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत ते आपल्या शरीराचा एक भाग छाटून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेट देणार आहेत, असं म्हणत आहेत. संथ गतीने सुरू असलेला पोलीस तपास जलद गतीने सुरू व्हावा, अशी मागणी देखील बंधू धनंजय ननावरे यांनी केली आहे. धनंजय ननावरे यांनी आपलं एक बोट कापल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.


विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर कारवाई?


नंदू ननावरे आत्महत्या प्रकरणात सुसाईड नोटमध्ये नावं सापडूनही स्थानिक विठ्ठलवाडी पोलिसांनी कारवाईत चालढकल केली. त्यामुळे या प्रकरणात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर कारवाईची टांगती तलवार असल्याची चर्चा उल्हासनगरमध्ये सुरू आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी व्हिडीओ तयार करत आपल्याला कोण त्रास देत होतं, याची माहिती दिली होती. तसंच त्यांच्या खिशात सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये काही जणांची नावं त्यांनी लिहून ठेवली होती. ही सुसाईड नोट हाती लागूनही गेल्या दोन आठवडे विठ्ठलवाडी पोलिसांनी याप्रकरणात कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे मृत ननावरे यांच्या भावाने विठ्ठलवाडी पोलिसांची भेट घेतली होती. मात्र त्यानंतरही विठ्ठलवाडी पोलिसांनी या प्रकारणात चालढकल केली. त्यामुळे ही चालढकल आता वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या अंगलट येण्याची चिन्हं आहेत. या प्रकरणात थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातल्यामुळे आता संजय गायकवाड यांच्यावर कारवाई होणार असल्याची चर्चा उल्हासनगर शहरात सुरू आहे.


हेही वाचा: