ठाणे: काही दिवसांपूर्वीच डोंबिवलीत झालेला वाद शिवसेना-भाजप नेत्यांना मिटवण्यास यश आल्यानंतर आता कल्याण पूर्वमध्ये हा वाद निर्माण झाल्याची चर्चा आहे. डोंबिवलीत खासदार श्रीकांत शिंदे आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मनोमिलनाची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे कल्याण पूर्वेतील शिंदे गटाचे महेश गायकवाड आणि भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या वादाची चर्चा रंगलीय. 


डोंबिवलीमध्ये काही महिन्यांपूर्वी कल्याण लोकसभेच्या जागेवरून शिवसेना-भाजप यांच्यामध्ये कलगीतुरा रंगला होता. एक दुसऱ्यांवर आरोप प्रत्यारोप करत भाजपने कल्याण लोकसभेवर दावा केला होता. त्यानंतर शिवसेना-भाजपची या जागेवरून चांगलीच जुंपली होती. भाजप शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने हा वाद मिटला आणि कल्याण लोकसभा शिवसेनेकडेच राहील असा निर्णय झाल्यानंतर भाजप शिवसेनेचे एकमत होण्यास सुरुवात झाली.


राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण आणि  खा. श्रीकांत शिंदे यांच्यात गेल्या काही वर्षांपासून ताणल्या गेलेल्या राजकीय संबंधांना अखेर पूर्णविराम मिळण्याच्या चर्चां डोंबिवलीत रंगल्या आहेत. या दोन नेत्यांमधील राजकीय मतभेदामुळे डोंबिवली शहरातील काही महत्त्वाचे विकास प्रकल्प रखडले होते. या प्रकल्पांना गेल्या काही दिवसांपासून अचानक गती मिळू लागली आहे.


महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले त्यानंतर डोंबिवलीतील शिंदे गटाने भाजपचे स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण यांची जागोजागी कोंडी करण्यास सुरुवात केली होती असा आरोप भाजपाकडून केला जात होता. भाजप सरकारच्या काळात राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीसाठी 375 कोटींचा निधी रस्ते कामांसाठी मंजूर करून आणला होता. रविंद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात नेहमीच सलोख्याचे संबंध राहिले. मात्र मागील चार वर्षांत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे महत्त्व ठाणे जिल्ह्यामध्ये वाढत गेले. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामध्ये आपसात मतभेद निर्माण झाला. याचा परिणाम डोंबिवलीतील विकासकामांवरही पहायला मिळाला. डोंबिवलीच्या विकासासाठी निधी मिळत नाही, मिळालाच तर तो अडवून ठेवला जातो अशी जाहीर ओरड रवींद्र चव्हाण यांनी केली होती.


शिंदे-चव्हाण यांच्यातील निधी वाद टोकाला पोहोचला असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे सरकारमधून बाहेर पडले. नंतरच्या सगळ्या राजकीय नाट्याचे दिग्दर्शन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दिल्लीच्या आदेशावरून रवींद्र चव्हाण यांनी पार पाडले. चव्हाण यांच्या पाठराखणीमुळे मुख्यमंत्रीपदी विराजमान झालो याची जाणीव एकनाथ शिंदे यांच्या मनात असली तरी खासदार शिंदे यांच्या मनात चव्हाण यांच्या विषयी सल कायम राहिल्याचे दिसत होते.


कल्याण-डोबिवली शहरांसाठी खासदार शिंदे यांनी एक हजाराहून अधिक कोटी रुपयांचा निधी आणला. खासदार शिंदे यांच्या कामाच्या धडाक्यापुढे चव्हाण फिके पडतील अशी रणनिती शिंदे गटातून सातत्याने आखली जात होती. त्यामुळे या दोन नेत्यांमधील विसंवाद दिवसेंदिवस वाढत होता. खासदार शिंदे यांच्या आक्रमक भूमिकेला आळा घालण्यासाठी भाजपने काही महिन्यापूर्वी कल्याण लोकसभेवर दावा ठोकला. यानंतर भाजप शिवसेना यांचा कलगीतुरा रंगला वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीने लोकसभेवरील वाद मिटवण्यात आला. राज्यातील गेल्या काही दिवसांतील घडामोडीमुळे मात्र चव्हाण-शिंदे यांच्यातील मनोमीलनाची चर्चा जोर धरू लागली आहे.


शिंदे गटाकडून सोशल मीडियातून रवींद्र चव्हाण यांना लक्ष्य करण्याचा प्रकार मागील काही महिन्यांपासून सुरू होता. तो आता पूर्णपणे थांबला आहे. रस्ते कामांसाठी मंत्री चव्हाण यांचा 371 कोटीचा रखडलेला निधी शासनाकडून आता वितरीत होऊ लागला आहे. मागील 20 वर्षांपासून डोंबिवलीतील विष्णुनगर मासळी बाजार, टिळक रस्त्यावरचे सुतिकागृह, आयरे-भोपर वळण रस्ता, डोंबिवली विभागीय कार्यालयाचा पुनर्विकास हे चव्हाण यांच्या मतदारसंघातील अनेक वर्षे रखडलेले प्रकल्प आता मार्गी लागत आहेत.


कल्याण पूर्वेतील भाजप शिवसेना वाद


कल्याण लोकसभेमधील डोंबिवलीतील भाजप शिवसेनेचे वाद कुठेतरी मिटले असले तरी कल्याण पूर्वमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड आणि कल्याण पूर्वचे शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यामधील वाद कधी मिटणार याकडे कल्याण डोंबिवलीकरांचे लक्ष लागले आहे.


महेश गायकवाड आणि आमदार गणपत गायकवाड यांच्यामध्ये पुन्हा वादाची ठिणगी पडली त्याला कारण होते सोशल मीडियावरील चर्चा. विकास कामे केले नाहीत, भ्रष्टाचार केले, जागा हडपल्या अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप शिंदे गटाचे महेश गायकवाड आणि भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सोशल मीडियामध्ये सुरू होते. त्यातून एकमेकांना आव्हान देऊन कामाचा लेखाजोखा द्या असे बोलण्यात आले. जर आपल्याला सहन होत नसेल तर सत्तेमधून बाहेर पडा असे आरोप देखील सोशल मीडियामध्ये करण्यात आले. मात्र पोलिसांच्या मध्यस्थीने हा वाद मिटवण्यात आला आहे. मात्र शिंदे गटाचे महेश गायकवाड आणि भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांच्यात राजकीय मतभेद हे कायम असल्याचे चित्र कल्याण पूर्वेत पहायला मिळाले.


शिंदे गटाचे कल्याण पूर्व शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड आणि भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांचे सुरू असलेले वाद मिटले तर डोंबिवलीत सुरू असलेले विकास कामे कल्याण पूर्वमध्ये देखील सुरू होतील यात काही शंका नसल्याचे सर्वसामान्य नागरिकता बोलत आहेत. 


ही बातमी वाचा :