ठाणे : धरणांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या शहापूर व कसारा भागातील जनतेचा घसा मात्र अजूनही कोरडाच आहे. मुंबईपासून (Mumbai) हाकेच्या अंतरावर असलेल्या शहापूर तालुक्यात भातसा , तानसा, वैतरणा, मोडकसागर सारख्या महाकाय जलाशयांच्या जलसंपत्तींचा ठेवा उशाशी असतानाही येथील आदिवासींना घोटभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तालुक्यातील शहापूर ,कसारा माळ,विहिगाव,ढेंगणमाळ,सुसरवाडी, वशाळा ,साठगाव, सावरदेव पाडा, चिंध्याचीवाडी, कोथळा,आपटे गावासह जवळपास 250 गाव पाड्यावर भीषण पाणीटंचाई (Water) असून  192 गाव पाड्यावर टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. या परिसरात विहिरी कोरड्या ठाक पडलेल्या आहेत, काही विहिरीत दगडाच्या फटीतून थेंब थेंब पाणी विहिरीत जमा होते आणि एक हंडा पाणी साचायला जवळपास एक ते दोन तास लागतात. विहिरीतील पाणी खोलगट भागात असल्याने जीव धोक्यात घालून फक्त एक हंडा पाण्याकरता महिला व पुरुष विहिरीमध्ये उतरतात तसेच विहिरीच्या कठड्यावर उभे राहून दोरीच्या मदतीने पाणी खेचून पाणी भरलं जातं. त्यामुळे जीवाचा धोका कायम असतो.


तालुक्यात जानेवारी महिन्यापासूनच पाण्याची टंचाई भासू लागल्याने तालुक्यातील 250 गाव पाड्यावर भीषण पाणीटंचाई असून 192 गावपाड्यांवर फक्त 42 टँकर ने पाणी पुरवठा केला जात असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. त्यामुळे काही गावपाड्यांना 2 ते 3 दिवसाआड टँकरचे पाणी मिळते. तर काही गाव पांड्याना टँकरचे पाणी देखील मिळतच नाही. त्यामुळे पाणी आणण्याकरता येथील महिला 3 ते 4 किलोमीटर जीव धोक्यात घालून डोंगराळ भागातून खाली उतरून पायपीट करतात. एक हंडा पाण्यासाठी रात्रभर येथील महिला रांगा लावून बसलेल्या असतात. दगडाच्या फटीतून झऱ्याप्रमाणे थेंबब थेंब पाणी साचल्यावर ते पाणी आपल्या भांड्यात भरलं जाते. ज्या भागात चार मोठे धरणं असून पाणी डोळ्याने दिसतं, पण प्यायला मिळत नाही. धरण उशासी अन कोरड घसाशी अशी अवस्था या गावकऱ्यांची झाली आहे. नेतेमंडळींचे अनेक दौरे या भागात होत असतात, अनेकदा मौखिक आश्वासने दिली जातात. परंतु ती पूर्ण होताना गावकऱ्यांनी कधी पाहिलीच नाही. मात्र, एवढा भीषण दुष्काळ पाहूनही प्रशासन वर्षानुवर्षे झोपेचं सोंग का घेताय, असा सवाल गावकऱ्यांना तर पडलाचं आहे. मात्र आत्तातर  गावकऱ्यांनी त्या अपेक्षाही सोडून दिल्या आहेत. 


योजनांवर कोट्यवधींचा खर्च


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हर घर जल हर घर नल या योजनेतून प्रत्येक गावात पाणीपुरवठा होणार असा गवगवा केला. तर दुसरीकडे करोडो रुपये खर्च करून पाणी घरापर्यंत नळाद्वारे पोहोचवण्यासाठी योजना राबवली  जात आहे. भावली धरणातून शहापूर तालुक्यातील 97 गाव आणि जवळपास 250 पाड्यांसाठी त्याचबरोबर आजूबाजूच्या टंचाईग्रस्त गाव पाड्यांसाठी 316 कोटी रुपये शासनाने मंजूर केले आहेत. त्यापैकी त्यापैकी 162 कोटी पाईप खरेदी, जलकुंभाची कामे, विविध विभागाची परवानगी, खोदकाम व जीएसटी साठी खर्च झाले असून ऑगस्ट 2024 पर्यंत काम पूर्ण होणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितले. तर, हर घर जल हर घर नल योजनेत शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद गटातून मंजूर करण्यात आलेले 205 कोटी जलजीवन मिशन अंतर्गत त्यातील 65 कोटी रुपये पाण्याच्या टाक्या व पाईपलाईन खोदण्यासाठी खर्च करण्यात आले आहेत. शहापूर तालुक्यात दोन प्रकल्पामध्ये 521 कोटी रुपये मंजूर असून 227 कोटी रुपये आतापर्यंत खर्च करण्यात आले आहे. मात्र तरी देखील शहापूरकरांची तहान अजूनही भागलेली नाही. याशिवाय शहापूरकरांनी अनेकवेळा पाण्यासाठी हंडा आंदोलनं केली आहेत. तर पाईपलाईन खोदकाममध्ये देखील निष्कृष्ट काम होत असल्याचा उघड स्थानिकांनी केला होता.


ग्रामस्थांकडून संताप अन् इच्छा


गेल्या अनेक वर्षांपासून शहापूर तालुका व कसारा भागातील महाकाय धरणांमधून अख्या मुंबईला पाणीपुरवठा केली जातो. परंतु, शहापूर व कसारा भागातील गावपाड्यांवरील जनतेला घोटभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. धरणांचा पाणी डोळ्यांनी पाहता येते, परंतु त्या पाण्यापासून आपली तहान भागवता येत नसल्याची खंत गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. धरण उसाशी अन कोरड घशाची अशीच काही परिस्थिती येथील गावकऱ्यांची झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने आमच्याकडे आता तरी लक्ष दिलं पाहिजे, अशी इच्छा गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.