ठाणे : भिवंडी लोकसभेच्या निवडणुकीनंतर भाजपमधला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचं दिसतंय. लोकसभा निवडणुकीत आमदार किसन कथोरे यांनी विरोधी पक्षाच्या उमेदवाराला मदत केल्याचा आरोप महायुतीचे उमेदवार कपिल पाटलांनी केला. पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचंही कपिल पाटील म्हणाले. 


भिवंडी लोकसभेच्या प्रचारादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आमदार किसन कथोरेंची भेट घेतली होती. लोकसभा निवडणुकीत कथोरे हे कपिल पाटलांना मदत करतील अशी गॅरंटीही घेतली होती. मात्र ही गॅरंटी फेल घालवणाऱ्या माणसाला फडणवीसही माफ करणार नाहीत असं कपिल पाटील म्हणाले. 


भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये 20 मे रोजी मतदान झालं असून महायुतीचे कपिल पाटील आणि महाविकास आघाडीचे बाळ्यामामा म्हात्रे यांच्यात लढत आहे. 


फडणवीसांची गॅरंटी फेल घालवणाऱ्याला माफी नाही


मुरबाड येथील एका कार्यक्रमात भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, भारतीय जनता पार्टी पक्षात असून ज्यांनी पक्षाच्या विरोधात काम केले त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारादरम्यान मुरबाडमध्ये येऊन आमदार किसन कथोरे यांच्यासोबत एका ठिकाणी बैठक घेऊन त्यांची गॅरंटी घेतली होती. आता त्यांची गॅरंटी फेल घालवणाऱ्या माणसाला देवेंद्रजीही माफ करणार नाहीत. 


आमदार किसन कथोरे यांनी भाजप पक्षाच्या विरोधात काम केलं असून त्यांनी विरोधी पक्षाच्या उमेदवारांची  मदत केली असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांचा निश्चित करेक्ट कार्यक्रम हा होणारच आहे, अशी आक्रमक भूमिका कपिल पाटील यांनी मांडली. 


आमदार किसन कथोरे यांनी कपिल पाटलांच्या आरोपांना उत्तर दिलं. ते म्हणाले की, कपिल पाटलांनी आपल्या नावाचा कुठेही उल्लेख केला नसल्यामुळे आपण या संदर्भात बोलणे योग्य नाही. मला जर विरोधात काम करायचे असते तर मी उघड काम केले असते आणि मी जर विरोधात काम केले असते तर त्याचे काय झाले असते ते सर्वांना माहीत आहे. 


कपिल पाटलांनी केलेल्या थेट आरोपांमुळे मुरबाडचे आमदार किसन कथोरे हे 4 जूनच्या निकालानंतर भारतीय जनता पार्टी पक्षाचा राजीनामा देणार की त्यांची पक्षातून  हकलपट्टी होणार या चर्चांना आता उधाण आलं आहे.  


ही बातमी वाचा: