ठाणे : ठाण्यातील दूध विक्रेत्यांचा (Thane Milk News)  एकदिवसीय लाक्षणिक बंदची घोषणा (Milk Vendor Strike)  केली आहे. आज रात्री 12 पासून शुक्रवार रात्री 12 वाजेपर्यंत दूध विक्री करणार नसल्याचं दूध विक्रेता संघानं जाहीर केलं आहे. दुधाच्या किंमतीत दरवर्षी वाढ होत आहे मात्र दूध विक्रेत्यांच्या कमिशनमध्ये वाढ झालेली नाही, त्यामुळे एक दिवस दूध विक्रेत्यांनी लाक्षणिक बंदची घोषणा केली आहे. 


ऐन दिवाळीच्या तोंडावर दूध विक्री बंद करण्याची घोषणा केली आहे. 2015 पासून आतापर्यंत एका लिटर मागे 20 रुपयांनी दूधाचे दर वाढले आहेत.  पण दूध विक्रेत्यांना त्यांच्या कमिशनमध्ये 10 पैसे देखील वाढवून दिले गेले नाहीत. त्याचमुळे एक दिवस लाक्षणिक बंद ठेवण्यात येणार आहे. या बंदामुळे  तब्बल दहा लाख लिटर दूध विकले जाणार नाही. ऐन दिवाळीच्या तोंडावर दूध विक्री बंद राहिल्याने लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांना याचा फटका बसणार आहे.  एका लिटरमागे 10 टक्के कमिशन देण्याची मागणी दूध विक्रेता संघाने केली आहे.  
ठाण्यानंतर मुंबई आणि पनवेलमध्ये देखील संपाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.


ठाण्यामध्ये दर दिवसाला दहा लाख लीटर दूधाची विक्री होते. ठाणेकरांच्या दूधाची मागणी ही विविध दूध कंपन्या पूर्ण करतात. ठाणे शहरात कमीतकमी सातशे दूध विक्रेते आहे. दूध उत्पादन कंपन्या वर्षाला दूध दराच्या किंमतीत वाढ करतात. परंतु उत्पादन करणाऱ्या कंपन्या घरोघरी दूध पोहचवणाऱ्या विक्रेत्यांचा विचार करत नाही. दूध विक्रेत्यांना फक्त दोन टक्के कमिशन मिळते. गेल्या पाच वर्षात विक्रेत्यांच्या कमिशनमध्ये 10 पैसे देखील  वाढ न झाल्याने विक्रेत्यांनी बंदाची घोषणा केली आहे.


देशभरातील दूध संघांनी दुधाचे दर वाढवले


देशात जानेवारी ते मार्च दरम्यान दुधाचे दर आणखी वाढणार आहेत. कारण जानेवारी ते मार्चमध्ये देशात दुधाची टंचाई निर्माण होऊ शकते, असं मत इंडियन डेअरी असोसिएशनचे संचालक चेतन नरके यांनी व्यक्त केले. याचे मुख्य कारण म्हणजे जनावरांचा लम्पी आजार. या रोगामुळे पशुधन कमी झालं आहे. दूध संघ जादाची दूध पावडर करून ठेवत असतात. मात्र, यंदा तसं  होत नाही. त्यामुळं, उन्हाळ्यात ज्या वेळी दूध संकलन कमी होतं, त्यावेळी पावडरचा वापर करुन मागणी पूर्ण केली जाते. पण यंदा हा समतोल राखणं कठीण होणार आहे. आताच्या घडीला अमूलसह देशभरातील दूध संघांनी दूधाचे दर वाढवले आहेत. हे दर आणखी पाच ते सहा रुपये प्रतिलिटर वाढू शकतात, असा अंदाज आहे.