कल्याण: 'कोणता झेंडा घेऊ हाती' या झेंडा सिनेमातील गाण्यात दिसणाऱ्या कार्यकर्त्याप्रमाणे कल्याण डोंबिवलीतील शिवसैनिकांची अवस्था झाली आहे . एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर आता शिंदे विरुद्ध ठाकरे संघर्ष पेटलाय. राज्यात काही ठिकाणी शिंदे यांच्या समर्थनार्थ बॅनर लागले आहेत तर काही ठिकाणी उद्धव ठाकरे यांचे समर्थन करण्यात येतय. मात्र या शिंदे विरुद्ध शिवसेनेच्या संघर्षात कल्याण डोंबिवलीमधील शिवसैनिक मात्र तटस्थ दिसत आहे. 


कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेचं वर्चस्व असून त्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांचा दबदबा आहे. शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिंदेसेना की शिवसेना असा सवाल या कार्यकर्त्यांमध्ये आहे. मात्र तूर्तास चित्र स्पष्ट होईपर्यंत वेट अँड वॉच ची भूमिका असल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलं. 


शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर आता शिंदे विरुद्ध ठाकरे संघर्ष शिगेला पोचला आहे. जिथे राजकीय विश्लेषकांना या संघर्षाचा नेमका अर्थ सापडलेला नाही तिथे सर्वसामान्य शिवसैनिकांची तर गोष्टच वेगळी आहे. राज्यात अनेक ठिकाणी शिंदे यांच्या समर्थनार्थ तर काही ठिकाणी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ बॅनर लागले आहेत. मात्र याचवेळी कल्याण डोंबिवलीतील शिवसैनिक तटस्थ आहे. तसं पाहिल्यास कल्याण डोंबिवलीच्या एकूण राजकारणात एकनाथ शिंदे यांचा प्रचंड दबदबा आहे. आजवर प्रत्येक डोंबिवलीकर शिवसैनिकासाठी ठाणे मार्गे मातोश्री असाच प्रवास राहिला आहे. यामुळेच त्यांच्या मनात गोंधळ उडाला आहे. काही झालं तरी आम्ही शिवसेनेसोबत असल्याचे शिवसैनिक दबक्या आवाजात बोलत असले तरी ही ताटातूट खरीखुरी नसावी, तर हा एक नियोजित कट असावा आणि पुन्हा सर्व काही सुरळीत व्हावे अशी अपेक्षा शिवसैनिकाकडून केली जात आहे. 


राजकारणाचे बाळकडू बाळासाहेबाच्या शिवसेनेने दिले तर राजकारणात पावलोपावली आलेल्या अडथळ्यावर मात करण्यासाठी शिंदे साहेबांनी मदत केली, यामुळे कोणाची बाजू घ्यावी हेच कळत नसल्याने कार्यकर्त्यांत संभ्रमाचे वातावरण आहे. आजवर कल्याण डोंबिवली शिवसेनेसाठी एकनाथ शिंदे यांचा शब्द प्रमाण आहे. तर त्याच एकनाथ शिंदे यांनी आता बंड पुकारलं असून शिंदे विरुध्द ठाकरे असा उभा संघर्ष सुरू आहे.व या संघर्षात वेट अँड वॉच ची भूमिका ठेवत आपण कोणाबरोबर यावर भाष्य करणे मात्र कल्याण डोंबिवलीतील शिवसैनिक टाळत आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसात एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप-मनसे मधील 10 ते 15 नगरसेवकांनी भगवा खांद्यावर घेतल्यामुळे हे नगरसेवक शिंदे समर्थक असणार यात शंका नाही. मात्र याचवेळी अनेक वर्षापासून शिवसेनेत असलेले नगरसेवक संभ्रमात आहे. 


सध्या पालिकेत शिवसेनेचे 56 नगरसेवक असून नव्याने इतर पक्षातून 12 नगरसेवक सेनेत दाखल झाले आहेत. राजकीय घडामोड कोणता रंग घेते यावर या 68 नगरसेवकाचे भवितव्य ठरणार आहे.


सध्या पालिकेतील शिवसेनेचे बलाबल


कल्याण पश्चिम 23


कल्याण पूर्व - 17


डोंबिवली पश्चिम -7


डोंबिवली पूर्व – 4


कल्याण ग्रामीण - 5