Thane MNS Avinash Jadhav :  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena ) नेते आणि ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याचे मनसेने म्हटले आहे. या प्रकरणी मनसे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी नौपाडा पोलिसात (Thane Naupada Police Station) तक्रार दाखल केली आहे. अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी देणारी क्लिप व्हायरल होत असल्याचे मनसेने म्हटले. 


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभरातील अनधिकृत मशीद, मजार आणि दर्ग्याची उभारणीकडे सरकारचे लक्ष वेधले होते. त्यानंतर सरकारने तत्परतेने माहिम व सांगलीतील मजारवर तातडीने कारवाई करून उध्वस्त केले होते. तर, दुसऱ्याच दिवशी मनसे नेते अविनाश जाधव यांनी मुंब्रा येथील डोंगरात वनखात्याच्या अखत्यारीत असलेल्या जागेवरील अनधिकृत दर्ग्याचा प्रकार उघडकीस आणला होता. या प्रकरणी जाधव यांनी प्रशासनाला 15 दिवसात कारवाई करण्याचा अल्टीमेटम दिला होता. मनसेच्या या इशाऱ्यानंतर जिल्हा प्रशासन  आणि वन विभागाने तात्काळ संबंधित ठिकाणची पाहणी केली होती. 


उसे जिंदा नही छोडेंगे


जिल्हा प्रशासन व वनविभागाने मुंब्रा डोंगरावर पाहणी करून चौकशी सुरु केली असतानाच काही मुस्लीम धर्मांध याविरोधात एकवटण्यास सुरुवात झाली असल्याचे मनसेने म्हटले. त्यातील काहींनी अविनाश जाधव यांना, " हम उसे जिंदा नही छोडेंगे ... कोई गुस्ताख छुप न पाएगा ... हम उसे ढुंड ढुंड के मारेंगे ... " अशा आशयाचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. एस आर कमिटी ... बॉयकॉट अविनाश जाधव अशा आशयाच्या या व्हिडीओतील धमकी देणारी व्यक्ती दिसत नाही, असे मनसेने म्हटले आहे.  या धमकीनंतर महाराष्ट्र सैनिक संतप्त झाले आहेत. या व्हायरल व्हिडीओची दखल घेत मनसे ठाणे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे यांनी नौपाडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. 


पुण्येश्वर  आणि नारायणेश्वर मंदिराचा वाद पेटणार? 


पुण्यातील पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिराचा वाद आता पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने तात्काळ या दोन्ही ठिकाणी उत्खनन सुरू करून तिथं पुन्हा मंदिरं उभारावीत, अशी पुन्हा एकदा मनसेने मागणी केली आहे. पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिरासाठी मनसेचा पूर्वीपासूनच लढा सुरू आहे. पूर्वी या ठिकाणी हिंदू मंदिर होती तसे प्राचीन अवशेष आणि पुरावेही सापडले असल्याचा दावा मनसेने केला आहे. 


दरम्यान, इतिहासकार संजय सोनावणी यांनी म्हटले की, 10 वर्षांपूर्वी तिथे मशिद होती. त्याचं खोदकाम करताना भूमिगत गटाराचे अवशेष मिळाले. त्या गटाराच्या अवशेषाला किंवा विटाच्या कमानीला मंदिराचे अवशेष म्हणून जाहीर करायचं हा असा उपद्व्याप दुर्देवाने केला जात आहे. त्या ठिकाणी दर्गा होता. मंदिरं असल्याचा प्रश्नच येत नाही. धार्मिक पोथीतसुद्धा याचा उल्लेख नाही. त्यासाठी वाद निर्माण करण्याची काहीच गरज नाही आहे.