Bhiwandi Fire : भिवंडीत आगीचे (Bhiwandi Fire) सत्र काही थांबताना दिसत नाही. नायगाव (Naigaon) परिसरात पहाटेच्या सुमारास एका कपड्याच्या दुकानाला (Clothing shop) भीषण आग लागल्याची घटना घडली. तीन मजली इमारतीच्या तळ मजल्यावरील कपड्याच्या दुकानात अचानक भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान, इमारतीत अडकलेल्या 70 ते 80 नागरिकांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. 


 70 ते 80 रहिवाशावांना काढलं बाहेर 


आलिया कॉम्प्लेक्स या तीन मजली इमारतीच्या तळ मजल्यावर सईद कलेक्शन या कपड्याच्या दुकानात आग लागल्यानं इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दुकानात आग लागल्याचे समजतात रहिवाशांनी तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण केलं. मात्र, अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचेपर्यंत या आगीनं रौद्ररूप धारण केलं होतं. संपूर्ण दुकान आगीनं भक्षस्थानी घेतलं होतं. धुराचे लोळ मोठ्या प्रमाणात पसरण्यास सुरुवात झाली. या आगीवेळी 70 ते 80 रहिवाशी इमारतीत अडकले होते. त्यांना स्थानिकांच्या तसेच अग्निशमन दलाच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले असून घरगुती सिलेंडर गॅस देखील बाहेर काढण्यात आले आहेत. दरम्यान, अचानक आग लागल्याच्या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळं परिसरात काही काळा भीतीचं वातावरण पसरलं होतं.


एक तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश


या दुकानात लागलेली आग कोणत्या कारणानं लागली हे अजूनही समजू शकलेलं नाही. मात्र या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तब्बल एक तासाच्या प्रयत्नानंतर जवानांनी आग नियंत्रणात आणली असून सध्या कुलिंगचे काम सुरू आहे. वेळीच जर स्थानिक नागरिकांनी इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना बाहेर काढलं नसतं तर या ठिकाणी मोठी दुर्घटना घडली असती. दरम्यान, कापड्याचे दुकान जळून खाक झाल्यानं मोठं नुकसान झालं आहे. 


भंडाऱ्यात मध्यरात्री किराणा दुकानाची राखरांगोळी, 80 लाखांचं नुकसान झाल्याचं प्राथमिक अंदाज..


भंडाऱ्यात मध्यरात्रीच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत किराणा दुकानासह मंडप डेकोरेशनचं संपूर्ण साहित्य जाळून खाक झाले आहे. ही घटना भंडाऱ्यातील पिंपरी पुनर्वसन येथील सचिन कारेमोरे यांच्या मालकीच्या गुरुदेव किराणा दुकानात घडली आहे. यात संपूर्ण साहित्य जाळून खाक झालं आहे. या आगीत दुकानदाराचे तब्बल 80 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Nashik Factory Fire : नाशिकच्या वडाळागावात गादी कारखान्याला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी टळली!