Agriculture News : शेती क्षेत्रासमोर सातत्यानं नवनवीन संकट येतात. कधी आस्मानी असतं तर कधी सुलतानी. मात्र, या सर्व संकटांचा सामना करत काही शेतकरी (Farmers) शेतात नवनवीन प्रयोग करताना दिसत आहेत. या माध्यमातून चांगला नफाही मिळवत आहेत. ठाणे (Thane) जिल्ह्यातील शहापूर (Shahapur) तालुक्यातील एका शेतकऱ्याने सेंद्रिय शेतीतून (organic farming) अवघ्या तीन महिन्यात सूर्यफूल, कांदा, काकडी आणि भेंडीच्या शेतीतून पाच लाख रुपयांचा नफा मिळवला आहे.


एकीकडे सगळीकडे पडणारा अवकाळी पाऊस आणि लहरी मान्सूनमुळं अनेक शेतकरी शेतीपासून दूर जात असल्याचे चित्र दिसत आहे. अशातच शहापूर तालुक्यातील चरीव येथील युवा शेतकरी  गजानन जमवणे यांनी शेतीत विविध पिकांची लागवड करत चांगला नफा मिळवला आहे. गजानन जमवणे यांनी वडिलोपार्जित असलेल्या दोन एकर शेतीमध्ये अत्याधुनिक पद्धतीची कास धरत नवीननवीन प्रयोग करत लाखोंचे उत्पन्न घेतलं आहे.


सूर्यफूल शेतीत  कांदा, भेंडी, काकडीची अंतर्गत लागवड


चरीव गावातील शेतकरी गजानन उमवणे यांनी दोन एकर शेतीमध्ये सूर्यफूलशेती करुन त्यामध्ये कांदा, भेंडी, काकडी ही नगदी पिकाची अंतर्गत लागवड केली आहे. कुठल्याही प्रकारच्या रासायनिक खतांचा, औषधांचा वापर न करता सेद्रींय पद्धतीनं त्यांनी ही लागवड केली. यासाठी त्यांना 50 हजार रुपयापर्यंतचा खर्च आला असून लागवडीच्या एका महिन्यांपासून उत्पन्न चालू झाले आहे.


संकटांचा सामना करत घेतलं चांगले उत्पादन 


सध्याच्या परिस्थितीत निसर्गात होणारे बदल, शेतमालास नसलेला हमीभाव, खत, औषधे यांच्या वाढलेल्या किंमती या विविध समस्याने शेती आणि शेतकरी दोन्ही अडचणीत सापडले आहेत. सध्या तरुणवर्ग वडिलोपार्जित असलेल्या शेती व्यवसायापासून दूर जाताना दिसत आहेत. मात्र, गजानन उमवणे हे संकटाचा सामना करत शेतीतून चांगले उत्पन्न घेत आहेत.


युवकांना सेंद्रिय शेती करण्याचे आवाहन


शेतकरी गजानन उमवणे यांनी आपल्या शेतात सेंद्रिय पद्धतीनं पिकांची लागवड केली आहे. यामध्ये कांदा, सूर्यफूल, काकडी, भेंडींची लागवड केली आहे. या उत्पादनाला बाजारात चांगली मागणी असून आतापर्यंत चार ते पाच लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. आणखी दोन ते तीन लाख रुपयांचा नफा अपेक्षित असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. युवा शेतकऱ्यांनी देखील आधुनिकीकरणाची कास धरुन सेंद्रिय शेती करण्याचे आवाहन गजानन उमवणे यांनी केलं. 


महत्त्वाच्या बातम्या:


CM Eknath Shinde at Kaneri Math : सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकार सर्वोतोपरी मदत करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही