Kalyan News : "आज चार तास बैठक घेतली. पण काही प्रकल्प अनेक वर्षापासून सुरु आहेत याचे दु:ख आहे. याबाबत जो त्रास अधिकारी, कर्मचारी वर्गाला झाला पाहिजे तो त्यांना नाही. ज्याप्रकारे लोकप्रतिनिधींनी या बैठकीत आपले मत मांडले आहे, त्यानुसार व्यवस्थेत आणि कामकाजाच्या पद्धतीत बदल करण्याची गरज आहे," असे मत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी व्यक्त केले. तसेच दोन महिन्यानंतर पुन्हा येऊन या सगळ्याचा आढावा मी घेणार आहे, त्यात किती प्रगती झाली हे पाहणार आहे, असे केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सोमवारी (12 सप्टेंबर) कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयात कल्याण डोंबिवली महापालिका (KDMC), उल्हासनगर महापालिका, अंबरनाथ नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत विकासकामांचा आढावा घेतला. तब्बल चार तास ही जम्बो बैठक सुरु होती. 


केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे रविवारपासून कल्याण लोकसभा मतदारसंघात दौरा करत आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. डोंबिवलीचा दौरा आटोपल्यानंतर त्यांनी काल कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात देखील दौरा केला. यावेळी त्यांनी भाजप कार्यकर्त्यांसह व्यापाऱ्यांची देखील बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर सायंकाळी कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयाला भेट देत स्मार्ट सिटी कार्यालयाच्या सुरु असलेल्या यंत्रणेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी रस्त्यांच्या दूरवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली. मग केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण डोंबिवली महानगपालिका, उल्हासनगर महानगरपालिका, अंबरनाथ नगरपरिषदच्या अधिकाऱ्यांची कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयात बैठक घेतली.


या बैठकीला कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्यासह उल्हासनगर महापालिका आणि अंबरनाथ महापालिकेचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार गणपत गायकवाड, आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, माजी नगरसेवक देखील उपस्थित होते. या बैठकीत दोन महापालिका आणि एका पालिकेच्या हद्दीत सुरु असलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. तब्बल चार तास ही जम्बो बैठक सुरु होती. या बैठकीत महापालिका हद्दीतील वर्षानुवर्षे रखडलेल्या प्रकल्पाबाबत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी चांगली झाडाझडती घेतल्याचे बोलले जाते.


अनुरागजी आमची केडीएमसी फक्त सेटिंगमध्ये स्मार्ट आहे, मनसे आमदार राजू पाटील यांचं खोचक ट्विट
"अनुरागजी आमची केडीएमसी फक्त सेटिंग मध्ये स्मार्ट आहे. मग ती टक्केवारीची असो की नवनवीन पुरस्काराची असो. बरं झाले आपण घरचा आहेर दिला," असं खोचक ट्वीट मनसे आमदार राजू पाटील यांनी केलं. अनुराग ठाकूर यांनी स्मार्ट सिटी येथील कंट्रोल रुमला भेट दिली. यादरम्यान त्यांनी रस्त्यांच्या दूरवस्थेबाबत नाराजी व्यक्त करत 'ही स्मार्ट सिटी आहे हे ऐकून हैराण झालो' असे खडेबोल पालिका आयुक्तांना सुनावले. यानंतर मनसे आमदार राजू पाटील यांनी खोचक ट्वीट केलं. 


सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे कल्याण डोंबिवलीतील क्राईम डिटेक्शन 80 टक्के, डीसीपी सचिन गुंजाळ यांची माहिती
शहरात लावण्यात येणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबाबत पोलीस यंत्रणेकडून आढावा घेण्यात आला. या कॅमेऱ्यामुळे गुन्हेगारी किती कमी झाली याचा देखील आढावा घेतला. यावेळी स्मार्ट सिटी अंतर्गत लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे गेल्या आठ महिन्यात कल्याण परिमंडळ 3 चा क्राईम डिटेक्शन 80 टक्के आहे, असा खुलासा कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांनी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे केला. गेल्या काही महिन्यात सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात क्राईम डिटेक्शनमध्ये कल्याण डोंबिवली एक नंबरला आहे. डिटेक्शन रेट 65 टक्के होता. तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे 80 टक्क्यांवर पोहोचला आहे. इतकेच नाही तर कोर्टात सुद्धा याची मदत होत असल्याचे सांगितले.