Ambarnath Rains : अंबरनाथमध्ये (Ambarnath) रविवारी (11 सप्टेंबर) रात्रभर तुफान पाऊस कोसळला. मुसळधार पावसामुळे (Rain) जमीन खचून एका घराची भिंत दुसऱ्या घरावर कोसळली. यामुळे एकाच घरातील तिघे जण जखमी आहेत. यापैकी दोघांना गंभीर स्वरुपाची इजा झाली आहे.
अंबरनाथ पूर्वेतील आंबेडकर नगर भागात ही घटना घडली. या परिसरात काही घरं टेकडीवर असून काही घरं खालच्या भागात आहेत. काल रात्रभर या भागात मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे टेकडी परिसराची जमीन काहीशी खचली आणि टेकडीवर असलेल्या एका घराची भिंत खालच्या भागात राहणाऱ्या दिलीप सुरवाडे यांच्या घरावर कोसळली.
कुटुंब झोपलेलं असताना दुर्घटना
ही घटना घडली, त्यावेळी सुरक्षारक्षक म्हणून काम करणारे दिलीप सुरवाडे हे कामावर जायला निघाले होते. तर त्यांची पत्नी आणि मुलगा झोपलेले होते. अचानक घराच्या पत्र्यावर भिंत कोसळल्याने पत्रे, अँगल आणि भिंतीचा ढिगारा या सर्वांच्या अंगावर पडला. त्यामुळे दिलीप सुरवाडे आणि त्यांची पत्नी बेबी सुरवाडे या दोघांना डोक्याला गंभीर इजा झाली. तर मुलगा मंगेश सुरवाडे याला किरकोळ इजा झाली.
या घटनेनंतर स्थानिकांनी या सर्वांना बाहेर काढत अंबरनाथच्या छाया उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. तिथे प्राथमिक उपचार करून या सर्वांना घरी सोडून देण्यात आलं. या घटनेनंतर आम्हाला नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी दिलीप सुरवाडे यांनी केली आहे.
राज्यभर धुवांधार पाऊस
दरम्यान, गेल्या दोन दिवसापासून राज्यभरात धुवाधार पाऊस कोसळत आहे. कोकण ,पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळला. गेल्या काही दिवसांपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. मात्र गेल्या तीन-चार दिवसापासून सर्वत्र तुफान पाऊस बरसत आहे.
पुण्यात ढगफुटी
तिकडे पुणे शहर आणि परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. काल दुपारनंतर झालेल्या पावसामुळे कोथरुड, धनकवडी परिसरात गुडघाभर पाणी साचलं होतं. मुसळधार पावसामुळे धनकवडी भागातील चव्हाण सोसायटीमधील पन्नास वर्षे जुने वडाचे झाड कोसळले.
कोकणातही जोरदार पाऊस
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही पावसाने झोडपून काढले आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. पुढील तीन ते चार जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
नांदेडमध्येही ढगफुटी
माहुर तालुक्यातील वाई बाजार परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाला. ओढे नाले ओव्हरफ्लो झाले. गावात पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.