Kalyan Water Supply :  कल्याण डोंबिवलीकरांसाठी (Kalyan-Dombivli) लवकरच चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला स्वतंत्र धरणाचा (Dam for   Kalyan-Dombivli) प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची चिन्हं दिसत आहेत. कल्याण डोंबिवलीसाठी अंबरनाथ (Ambernath) तालुक्यातील कुशिवली धरण आरक्षित करण्याची आग्रही मागणी कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर (Vishwanath Bhoir) यांनी केली. या मागणीला ठाणे जिल्हा प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत जलसंपदा विभाग आणि केडीएमसीला तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार विश्वनाथ भोईर यांच्या उपस्थितीत कल्याण पश्चिम मतदारसंघातील प्रस्तावित विकासकामांसंदर्भात नुकतीच बैठक संपन्न झाली. ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या उपस्थितीत समिती सभागृहात झालेल्या या बैठकीत मतदारसंघातील महत्त्वाच्या विकासकामांचा आढावा घेण्यात आला. 


गेल्या दशकभरात कल्याण आणि डोंबिवली शहरांचा अतिशय वेगाने नागरी विस्तार झाला. अनेक मोठमोठी गृहसंकुले दोन्ही शहरांच्या वेशीवरील मोकळ्या जागांवर उभी राहिली आहेत. मुंबई, ठाण्यापेक्षा स्वस्त दरांमध्ये सुसज्ज आणि सुविधायुक्त अशी घरे उपलब्ध झाल्याने हजारांच्या संख्येमध्ये त्यांची विक्रीही झाली. परंतू त्याचा सर्व भार आता मूलभूत सोयी सुविधांवर येऊ लागल्याने कल्याण डोंबिवलीतील बऱ्याचशा नव्या गृहसंकुलांमध्ये पाण्याची समस्या निर्माण होऊ लागली आहे.


येत्या काळात ही पाणी समस्या अतिशय उग्र रूप धारण करेल याचा विचार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदार विश्वनाथ भोईर यांनी कल्याण डोंबिवलीसाठीच्या स्वतंत्र धरणाची गरज अधोरेखित केली होती. अंबरनाथ तालुक्यातील कुशीवली धरण कल्याण डोंबिवलीसाठी आरक्षित करावे किंवा या धरणातील पाण्याचा वाढीव कोटा केडीएमसीला देण्याची मागणी आमदार भोईर यांनी केली होती. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कोणताही वेळ न दवडता ठाणे जिल्हा प्रशासनाला यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.


काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी कुशिवलि धरणाच्या पाणी साठ्याबाबत जलसंपदा विभागाला तर पुढील 30 वर्षातील केडीएमसीची संभावित लोकसंख्या आणि पाण्याची गरज यासंदर्भात कल्याण कल्याण डोंबिवली महापालिकेला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. 


कल्याण डोंबिवलीची लोकसंख्या सध्या सुमारे 24 लाखांच्या घरात पोहोचली आहे.  सध्या आवश्यक तितका म्हणजेच प्रतिदिन 423 दशलक्षलीटर पाणी पुरवठा होत आहे. पुढील 30 वर्षांचा टप्प्याटप्प्याने विचार करता 2032 मध्ये लोकसंख्या 34 लाख 90 हजार आणि प्रतिदिन गरज 616 दशलक्षलीटर, 2042मध्ये 50 लाख 88 हजार आणि प्रतिदिन गरज 898 दशलक्षलीटर तर 2052 मध्ये लोकसंख्या 74 लाख आणि पाण्याची प्रतिदिन गरज 1हजार 310 दशलक्ष लिटर भासणार आहे. 


कल्याण डोंबिवली महापालिकेच्या भविष्यातील लोकसंख्येचा आणि आकडेवारीचा विचार करता मुबलक पाणी पुरवठ्यासाठी स्वतंत्र धरण आरक्षित करणे ही काळाची गरज बनली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे याविषयी अतिशय संवेदनशील असून येत्या काळात कल्याण डोंबिवलीकरांना स्वतंत्र धरण किंवा पाणीसाठ्याच्या वाढीव कोट्याबाबत योग्य तो निर्णय घेतील असा विश्वास आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केला आहे.