ठाणे : तुम्ही मासे खाणारे मराठी माणसं घाण, भिकारी आहात. तुमचे मराठीपण बाहेर काढतो असं म्हणत गुंडांकरवी मराठी भाषिकांना मारहाण केलेल्या अखिलेश शुक्ला या व्यक्तीबद्दल नवीन माहिती समोर आली आहे. एमटीडीसीमध्ये अकाऊंट मॅनेजरपदावर कार्यरत असणारा हा व्यक्ती खासगी गाडीवर अंबर दिवा लावून फिरायचा. त्याच्या गाडीवर महाराष्ट्र शासन असं लिहिल्याचंही समोर आलं आहे. तसेच सोसायटीतील नागरिकांना तो IAS अधिकारी असल्याचं सांगायचा आणि अरेरावी करायचा अशी माहिती समोर आली आहे. मराठी भाषिकांना मारहाण प्रकरणाची तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ करणारे पोलिस आता या प्रकरणाचा तपास करणार आहेत.  


ज्या खासगी गाडीवर अखिलेश शुक्ला हा महाराष्ट्र शासनाचा अंबर दिवा लावून फिरायचा त्या गाडीचा इन्शुरन्सही 10 मार्च 2020 रोजी संपल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सगळंच बेकायदेशीर वागणाऱ्या या हिंदी भाषिक अधिकाऱ्याच्या अरेरावीमुळे मराठी भाषिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. 


अखिलेश शुक्ला हा त्याच्या खाजगी वाहनाला अंबर दिवा लावत आल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली आहे. त्याची चौकशी करून कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 


वातावरण तापले, मराठी भाषिक आक्रमक


कल्याणमधील योगीधाम परिसरातील सोसायटीतील मराठी भाषिकांना अखिलेश शुक्ला याने गुंडाकरवी मारहाण केल्यानंतर आता मराठी भाषिक चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसून आलं. त्याच्यावर कारवाई करावी यासाठी शेकडो मराठी कुटुंब रस्त्यावर आली आहे.


तुम्ही मराठी माणसे घाण म्हणत गुंडांकरवी मारहाण


तुम्ही मराठी माणसं घाण आहात. तुम्ही मासे खाता, त्यामुळं तुमचा वास येतो, अशी शेरेबाजी करत तीन मराठी भाषिकांवर सराईत गुंडांकडून हल्ला करण्याची आल्याची धक्कादायक घटना कल्याणमधल्या उच्चभ्रू सोसायटीत घडली आहे. अखिलेश शुक्ला या एमटीडीसीमध्ये अकाऊंट मॅनेजरपदावर असलेल्या अधिकाऱ्यानं मराठी भाषिकांना मारहाण केल्याची तक्रार आहे. 


शेजारच्या महिलेशी झालेल्या वादात दोनजणांनी मध्यस्थी केल्याच्या रागानं शुक्ला धुमसत होता. त्यानं सराईत गुंडांना सांगून त्या तिघांना मारहाण केल्याचा आणि पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप पीडित रहिवाशांनी केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी किरकोळ गुन्हा दाखल केल्याचाही त्यांनी आरोप केला आहे. पोलिसांनी या घटनेवर बोलण्यास टाळाटाळ केल्याची माहिती आहे.


 



ही बातमी वाचा: