ठाणे : डोंबिवलीत पुन्हा एकदा फेरीवाल्यांची दादागिरी समोर आली आहे. आयटी इंजिनिअर असलेल्या एका तरुणाला फेरीवाल्याचा धक्का लागला. तरुणाने त्या फेरीवाल्याला जाब विचारला. या गोष्टीचा राग मनात धरुन चार ते पाच फेरीवाल्यांनी मिळून या तरुणाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. सुधीर पगारे असं या तरुणाचं नाव असून या प्रकरणी रामनगर पोलिसांनी तरुणाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तरूणाला फेरीवाल्यांकडून झालेल्या मारहाणीनंतर केडीएमसी आयुक्तांचा वॉकेबल सिटीचा दावा (Dombivli Walkable City) फेरीवाल्यांनी फोल ठरवल्याचं स्पष्ट होतंय.
तरुणाचे प्रशासनाला सवाल
मी इतका टॅक्स भरतो, माझ्या शहरात माझ्यासाठी फूटपाथवर चालायला मिळत नाही. जो फूटपाथ आहे त्यावर फेरीवाले बसतात. मला त्याचा फायदा काय? महापालिका काय करते? असा संतप्त सवाल सुधीर पगारे या तरुणाने केला आहे.
डोंबिवली पूर्व श्रीखंडेवाडी परिसरात सुधीर पगारे हा तरुण त्याच्या कुटुंबासह राहतो. शुक्रवारी तो काही कामानिमित्त डोंबिवली स्टेशनजवळील मधुबन टॉकिज परिसरात गेला होता. तो त्या ठिकाणाहून जात असताना त्याला एका फेरीवाल्याचा धक्का लागला. सुधीरने त्याला जाब विचारला.
जाब विचारल्याच्या रागात चार ते पाच फेरीवाल्यानी सुधीरला पकडून त्याला मारहाण केली. सुधीर पगारे याचे म्हणणे आहे की, मी डोंबिवलीचा सुशिक्षित सभ्य नागरिक आहे. मी महापालिकेला टॅक्स भरतो. परंतु चालण्यासाठी मला रस्ता मोकळा नाही, फूटपाथ नाही. जो रस्ता आहे. त्यावर फेरीवाले बसले आहेत. जेव्हा मी त्याची तक्रार करतो, त्यावेळी त्यांच्याकडून मला मारहाण केली जाते. ही कशी गुंडागर्दी आहे? महापालिका काय करते? असा संतप्त सवाल सुधीर यांनी उपस्थित केला आहे.
या प्रकरणात रामनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली आहे. मारहाण करणाऱ्या फेरीवाल्यांचा शोध सुरु आहे, त्यांच्या विरोधात ठोस कारवाई केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
महापालिका आयुक्तांचा दावा फोल
केडीएमसीच्या नव्या आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यानी स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करण्यासाठी शहराला वॉकेबल सिटी करण्यासाठी जे काही करता येईल ते करणार असल्याचा दावा केला होता. परंतु त्यांच्या या दाव्याचा पोलखोल झाला आहे. फेरीवाल्यांसमोर महापालिका प्रशासन हतबल झाले आहे. राजकीय पक्षांनी देखील आपली तलवार म्यान केली आहे. म्हणजे डोंबिवलीत नागरिकांना कुणीही वाली नाही हेच या घटनेतून उघड झाले आहे.
ही बातमी वाचा: