ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या ठाणे (Thane) जिल्ह्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या (Thane Municipal Corporation) छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील  (Chhatrapati Shivaji Maharaj Hospital) डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका चिमुरड्याला आपला हात गमवावा लागला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कळवा रुग्णालयाचा (Kalwa Hospital)  गलाथान कारभार समोर आलेला आहे.  डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे  भिवंडीतील 12 वर्षीय मुलगा क्रिकेट खेळायला गेला आणि हात गमावून बसल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.


समोर आलेल्या माहितीनुसार, आयुष शर्मा असे या मुलाचे नाव असून तो नयावस्ती ग्लोरी इंग्लिश हायस्कूलमध्ये इयत्ता चौथीत शिकत आहे. आयुष रविवार 24 डिसेंबर रोजी क्रिकेट खेळताना पडला आणि त्याच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर होऊन गंभीर दुखापत झाली. वडील राकेश शर्मा यांनी तात्काळ त्याला रुग्णालयात उपचारासाठी नेले असता तेथील डॉक्टरांनी कळवा रूग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी घेऊन जाण्याचा सल्ला दिला.


जखम स्वच्छ न करता धनुर्वाताचे इंजेक्शन दिले


 छत्रपती शिवाजी रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याच्या हाताची जखम स्वच्छ न करता व धनुर्वात इंजेक्शन न देता थेट प्लास्टर लावले आणि शनिवारी येण्यास सांगितले. परंतु शनिवारपूर्वीच आयुषच्या हाताची बोटे काळी निळी पडली. भीतीपोटी राकेश यांनी पुन्हा कळवा रुग्णालयात धाव घेतली असता डॉक्टरांनी त्यांना उशीर झाल्याचे सांगत पुढील उपचारासाठी सायन रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी सांगितले. दरम्यान सायन रुग्णालयातील डॉक्टरांनी आयुषच्या हाताला धनुर्वात झाल्यामुळे खांद्यापासून बाजूला केला.


मनसे स्टाईल आंदोलन छेडण्याचा इशारा


कळवा रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे माझ्या मुलाला हात गमवावा लागल्याचा आरोप आयुषचे वडील राकेश शर्मा यांनी केला आहे. याप्रकरणी राकेश शर्मा यांनी मनसे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे यांच्या मदतीने आयुक्तांकडे धाव घेत न्याय मिळण्याची मागणी केली आहे. याबाबत ठाणे पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी जेजे रुग्णालयामार्फत चौकशीचे आदेश दिले असून आठवड्याभरात पुन्हा याबाबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. जर कळवा रूग्णालयाने मुलाच्या भविष्याचा विचार करून नुकसान भरपाई दिली नाही तर पुढे जाऊन मनसे स्टाईल आंदोलन छेडण्याचा इशारा रविंद्र मोरे यांनी दिला आहे.


हे ही वाचा :


रुग्णालयामध्ये डॉक्टर उपलब्ध नसल्यानं मध्यरात्री राजन साळवी आक्रमक, डीन आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना विचारला जाब