ठाणे : अंबरनाथमध्ये एका बिल्डरच्या 20 वर्षीय मुलाचं तब्बल 40 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. यानंतर पोलिसांनी अतिशय वेगाने चक्रं फिरवत अवघ्या 12 तासात अपहरण केलेल्या मुलाची सुटका करत 10 अपहरणकर्त्यांना बेड्या ठोकल्या. पोलिसांच्या या वेगवान कामगिरीचं कौतुक होतंय.


अंबरनाथ पश्चिम भागात राहणाऱ्या एका बिल्डरचा 20 वर्षांचा मुलगा मंगळवारी 24 सप्टेंबर रोजी सकाळी घरातून त्याच्या स्विफ्ट कारने साईटवर जाण्यासाठी निघाला होता. यावेळेस त्याच्या मागावर असलेल्या अर्टिगा कारमधील अपहरणकर्त्यांनी गाडी आडवी घालून त्याचं अपहरण केलं. यानंतर त्याच्याच फोनवरून वडिलांना फोन लावत तब्बल 40 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. या प्रकारामुळे धास्तावलेल्या वडिलांनी थेट पोलिसांकडे धाव घेत याबाबतची माहिती दिली. यानंतर पोलिसांच्या सांगण्यानुसार बिल्डर वडिलांनी अपहरणकर्त्यांशी तडजोड करत खंडणीची रक्कम 40 कोटींवरून 7 कोटी आणि त्यानंतर 2 कोटीवर आणत पैसे देण्याची तयारी दर्शवली. त्यावर एक ओला कार बुक करून त्यामध्ये हे पैसे ठेवा आणि ती गाडी आम्ही सांगतो तिथे पाठवा, अशी मागणी अपहरणकर्त्यांनी केली.


10 अपहरणकर्त्यांना बेड्या ठोकल्या


 ही ओला गाडी अंबरनाथ एमआयडीसी, नेवाळी नाका आणि तिथून काटई नाक्याला अपहरणकर्त्यांनी बोलावून घेतली. मात्र पोलिसांनी सापळा रचल्याचा संशय आल्यामुळे अपहरणकर्त्यांनी पैसे नको असल्याचं सांगत संपर्क बंद केला. त्यामुळे अपहरण केलेल्या मुलाला धोका निर्माण झाल्यानं पोलिसांनी तातडीने मोबाईल लोकेशन आणि अन्य तांत्रिक माहितीच्या आधारे अपहरणकर्त्यांचा शोध घेत भिवंडीच्या पडघा परिसरातून 10 अपहरणकर्त्यांना बेड्या ठोकल्या. तर याच परिसरातील पिसे धरण भागातून अपहृत मुलाचीही पोलिसांनी सुटका केली. या अपहरणकर्त्यांकडून पोलिसांनी एक गावठी पिस्तूल, 3 जिवंत काडतुसं, एक एअरगन, एक कोयता यासह 3 गाड्याही जप्त केल्या आहेत. विशेष म्हणजे अपहरण झाल्यापासून अवघ्या 12 तासात पोलिसांनी आरोपींचा माग काढत त्यांना बेड्या ठोकल्या आणि अपहरण झालेल्या मुलाचीही सुखरूप सुटका केली. यासाठी संपूर्ण ठाणे पोलीस दलातील 100 पेक्षाही जास्त अधिकारी कर्मचारी कार्यरत होते. त्यामुळे या कामगिरीनंतर पोलिसांचं कौतुक होतंय.


 खंडणी मागणारा मुंबई फायर ब्रिगेडचा निलंबित कर्मचारी


 दरम्यान, अटक करण्यात आलेल्या 10 आरोपींपैकी एक आरोपी हा बिल्डर राहत असलेल्याच इमारतीत राहणारा असून तो मुंबई फायर ब्रिगेडचा निलंबित कर्मचारी आहे. मुंबई फायर ब्रिगेडमध्ये झालेल्या नोकर भरतीत त्याने अनेक जणांकडून पैसे घेऊन नोकरी देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र हा घोटाळा उघडकीस आल्यामुळे त्याच्यासह या प्रकरणातील आणखी एका आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाला आणि त्यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात हे दोघे सध्या जामिनावर असून ज्यांच्याकडून पैसे घेतले त्यांना ते परत करण्यासाठी त्यांनी हा सगळा अपहरणाचा डाव रचल्याचं पोलिसांनी सांगितलं. धक्कादायक बाब म्हणजे त्याला नोकरीसाठी पैसे दिलेल्या 3 तरुणांनीही आपले पैसे परत मिळण्याच्या आशेने अपहरण प्रकरणात त्याची साथ दिली. मात्र हा डाव पोलिसांनी हाणून पाडल्यामुळे या सर्वांची रवानगी आता जेलमध्ये झाली आहे.


हे ही वाचा :


दुर्दैवी, बिस्किटाच्या लालसेमुळे चिमुकल्यानं जीव गमावला; कंपनीतील मशिन बेल्ट गळ्याला लागल्यानं दुर्दैवी मृत्यू