Thane Crime News : ठाणे : अंबरनाथमध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेनं संपूर्ण शहर हादरलं आहे. एक चिमुकला आपल्या आईसोबत बिस्किट कंपनीत गेला होता. बिस्किटच्या लालसेपोटी चिमुकल्यानं हात घातला आणि मशिनचा बेल्ट लागला, त्यामुळे चिमुकल्याला आपले प्राण गमवावे लागले आहेत. चिमुकल्याच्या दुर्दैवी मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 


आईसोबत गेलेल्या 3 वर्षांच्या चिमुरड्याचा बिस्कीट कंपनीतील मशिनचा ब्लेट गळ्याला लागून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, मशिनच्या ब्लेटवरून जाणारे  बिस्किट उचलण्यासाठी हा चिमुरडा गेला असताना ही दुर्दैवी घटना घडली. ही घटना अंबरनाथमझी आनंद नगर भागात असलेल्या एमआयडीसीमधील एका बिस्कीट कंपीनीत घडली आहे. आयुष्य चौहान (वय 3) असं मृत चिमुरड्याचं नाव आहे.  याप्रकरणी अंबरनाथ पूर्वेतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे. विशेष म्हणजे, तो त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक आयुष्य हा अंबरनाथ पूर्वेतील आनंद नगर एमआयडीसी नजीक असलेल्या ठाकूर पाडा भागातील एका चाळीत आईवडिलांसह राहत होता. तो मूळचा बिहार राज्यातील असून मृतकाची आई पूजा कुमारी नितेश चौहान (वय 22) ही उपजीविकेसाठी बिस्कीट कंपनीतील 5 ते 6 कामगारांना जेवणाचे डब्बे पुरवते.  


नेमकं काय घडलं? 


नेहमीप्रमाणे 3 सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास आनंद नगर एमआयडीसी भागातील चिखलोली  प्लॉट क्रमांक 40, 41 येथील बिस्किट बनवणाऱ्या राधे कृष्ण कंपनीत मृत मुलासोबत जेवणाचे डब्बे देण्यासाठी गेली होती. त्याच सुमाराला मृत चिमुकला आयुषला मशिनच्या ब्लेटवरून बिस्किटे एका मागून एक जात असताना दिसले. त्यामधील एक बिस्किट उचलण्यासाठी तो वाकला. त्यानंतर त्याच्या गळ्याला बेल्ट लागून तो गंभीर जखमी झाला. 


दरम्यान, ही घटना पाहून कंपनीमधील कामगारांनी मशिन बंद करत चिमुरड्याला उल्हासनगर मधील मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे चिमुरडा राहत असलेल्या भागांत हळहळ व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, तो आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. 


याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले की, मृतक मुलाची आई कंपनीतील कामगारांना जेवणाचे डब्बे पुरवत असून घटनेच्या दिवशी मयत मुलगा हा तिच्या सोबत आला होता. तो चालू मशिनच्या बेल्टमधून बिस्किट उचलत असतानाच हा अपघात घडला आहे. त्याची 22 वर्षीय आई पूजा कुमारी चौहान हिच्या तक्रारीवरून अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पोलिसांनी तपास सुरू केल्याचे सांगितले.