Anandacha Shidha : शिंदे सरकारने मोठा गाजावाजा करीत यंदाच्या दिवाळीत गोरगरीब रेशनधारकांना 100 रुपयाची रेशन किटाची स्वस्त धान्य दुकानात उपलब्ध करून दिली. मात्र मुख्ममंत्र्यांच्या जिल्हातच गोरगरीब आदिवासी रेशनधारकाकडून 300 रूपयात विक्री शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात होत असल्याची बातमी एबीपी माझाने दाखवली होती. आदिवासी भागातील गोरगरीब आदिवासी बांधवांची फसवणूक करणाऱ्या दुकानदाराविरोधात शहापूर तहसीलदारांकडे तक्रार देखील करण्यात आली आणि माझ्यावर बातमी लागल्यानंतर पुरवठा अधिकारी गावात दाखल झाले. दिवाळी किटचा काळाबाजार उघडकीस आला आहे. गावकऱ्यांचे विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की, शंभर रुपयाचे किट त्यांना तीनशे रुपयात देण्यात आली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी दुकानदार एकनाथ भला यांची चौकशी केली. त्यांच्याकडे शिधा वाटपाची कोणतीही नोंद आढळली नसल्याने दुकानदारा विरोधात कसारा पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 चे कलम 3,7, पीडीएस कंट्रोल ऑर्डर 2015 अन्वे सरकार तर्फे गुन्हा दाखल करण्यात आला आहे
एबीपी माझ्याशी संवाद साधताना गावकऱ्यांनी सांगितले की, गरिबांची दिवाळी गोड करण्यासाठी शिंदे सरकारने किट दिले, परंतु हे किट आमच्यापर्यंत पोहोचले नाही. याआधी देखील दोन ते तीन महिन्यांनी धान्य वाटप केले जात होतं. अनेकांकडे रेशन कार्ड नाही. त्यामुळे त्यांना रेशन मिळत नाही. शासनाच्या अनेक योजना या ठिकाणी राबवली जात नाही. त्यामुळे त्याचा लाभ भेटत नाही, अशा अनेक समस्या गावकऱ्यांनी मांडल्या मात्र स्वस्त धान्य वाटप दुकानदारा विरोधात आवाज उठवला म्हणून 'व्हॉट्सअॅपवर त्यांना धमक्या देखील येत असल्याचे त्यांनी सांगितले.
शिंदे सरकारने गोरगरिबांची दिवाळी गोड करण्यासाठी 100 रुपयाचे किट स्वस्त धान्य दुकानातून देण्याची घोषणा केल्यानंतर शासकीय धान्य गोदामात वस्तू स्वस्त धान्य दुकानांवर उशिरा का होई ना दिवाळीच्या रेशन किट पोहोचले. मात्र स्वस्त धान्य दुकानदाराने 100 रूपयाची धान्याची किट 300 रूपयाला विकत असल्याची धक्कादायक बाब शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील फुगाळा, आगनवाडी येथील स्वस्त धान्य दुकानात घडली आहे. या दुकानाच्या मालकाने 100 रूपयाची धान्याची किट 300 रूपयाला विक्री करत असल्याचा आरोप करीत गावकऱ्यांनी शहापूर तहसीलदार यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली. त्यामुळे ऐन दिवाळीत गोरगरिबांचे दिवाळे काढणाऱ्या दुकानदाराची बातमी एबीपी माझाने दाखवल्यानंतर पुरवठा अधिकारी गावात पोहोचले व त्यांनी चौकशी करून संबंधित दुकानदारावर गुन्हा दाखल करून त्याचे लायसन्स रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. शिवाय या दुकानावरील धान्य व कीड वाटप थांबवण्यात आले आहे. यापुढे धान्य अथवा किट वाटप तलाठी तसेच पोलीस पाटील यांच्या समक्ष केले जाणार असल्याचे पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. जेणेकरून गोरगरीब जनतेची फसवणूक होणार नाही.
या घटनेनंतर शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली असून केंद्रीय पंचायती राज्यमंत्री कपिल पाटील यांनी संबंधित दुकानावर लवकरच कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती भिवंडी येथे आनंद किट्स वितरण प्रसंगी दिली आहे. शासना कडून सर्वसामान्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला जात असताना काही विघ्न संतोषी दुकानदारांकडून त्यामध्ये खोडा घातला जात असल्याचं सांगत आदिवासी समाज बांधवांच्या अज्ञानीपणाचा गैरफायदा कोणी घेऊ नये, अशी प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली. ते म्हणाले, संबंधित दुकानदारावर झालेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून योग्य ती चौकशी करून संबंधित दुकानचा परवाना रद्द केला जाईल.