ठाणे: मुख्यमंत्र्यांच्या ठाणे शहरात (Thane Firing News) एकाच दिवशी दोन गोळीबाराच्या घटना घडल्याने प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. मात्र ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी देखील बारा तासांच्या आत दोन्ही घटनांची गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. धक्कादायक म्हणजे दोन्ही घटनांचे गुन्हेगार एकच आहेत. ठाण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाणे पोलिसांनी केलेल्या कामगिरी बद्दल माहिती दिली.
ठाण्यातील नौपाडा आणि येऊर भागात शुक्रवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार झाले. या गोळीबारात कुख्यात गुंड गणेश जाधव याचा मृत्यू झालेला आहे. या गोळीबार प्रकरणी ठाणे पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. विपीन मिश्रा, सौरभ शिंदे , सुरज मेहरा अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत. आपसातील वादातून आरोपींनी हा गोळीबार केल्याचे तपासात उघड झाले आहे. नौपाडा येथील घंटाळी परिसरात शुक्रवारी पहाटे 5.30 वाजताच्या सुमारास येथे रिक्षा मधून तीनजण आले होते. त्यांनी येथील बांधकाम व्यवसायिक बाबा माने याच्या कारची काच फोडली. परिसरात आरडाओरड झाल्यानंतर नागरिकांनी त्यांना अटकाव केला. त्यानंतर तिघेही निघून गेले. काहीवे ळाने पुन्हा हे तिघेही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसरातील दुकानात काम करणारा अश्विन गमरे याच्या छातीखाली डाव्या बाजूस गोळी झाडली. गोळीबार केल्यानंतर तिघेही आरोपी पळून गेले.
या घटनेनंतर चार तास उलटले असतानाच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर वनक्षेत्रात कुख्यात गुंड गणेश जाधव उर्फ काळा गण्या याच्या डोक्यात आणि मानेवर गोळी झाडण्यात आल्याचा प्रकार समोर आला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या दोन्ही प्रकारामुळे संपूर्ण ठाणे शहरात खळबळ उडाली. दरम्यान यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी ठाणे गुन्हे अन्वेषण शाखा आणि नौपाडा पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला होता. या गोळीबारामागे विपीन मिश्रा आणि सौरभ शिंदे यांचा संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने दोघांनाही मुलुंड येथून ताब्यात घेऊन अटक केली. तर नौपाडा पोलिसांनी सुरज याला ताब्यात घेऊन अटक केली.
घटनाक्रम
घंटाळी येथे कारची काच फोडल्यानंतर आरोपी हे बदलापूरला गेले. तिथून पुन्हा ते घटांळी येथे आले. तिथे गोळीबार केल्यानंतर ते पुन्हा येऊरला गणेश जाधव याच्यावर हल्ला करण्यासाठी गेले. तिथे त्याला गोळ्या झाडल्या. येऊरच्या नागरिकांनी आणि पोलिसांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. परंतु संध्याकाळी त्याला मृत घोषित करण्यात आले.
गणेश जाधव याच्याविरोधात एकूण 26 गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये मारहाण, खूनाचा प्रयत्न यांसारख्या गंभीर गुन्ह्याचा सामावेश आहे. तर विपीन विरोधातही चोरीसारखे गुन्हे दाखल आहेत. दोघांचीही कारगृहात ओळख झाली होती. तसेच बाबा माने हा देखील त्यांच्या परिचयाचा होता. आपसातील वादातून हा खून झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.