ठाणे : भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेस पक्षाचे उमेदवार दयानंद चोरगे निवडणूक लढवत आहेत. परंतु या मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये राहून समाजवादी पक्षाने आपला उमेदवार रियाज आजमी यांना उभा केला आहे. तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाचे बंडखोर विलास पाटील आणि आस्मा चिखलेकर अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहेत.त्यामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे.
सहा महिन्यापूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा निवडून आले. भिवंडी पूर्वेत खासदार सुरेश म्हात्रे महाविकास आघाडीच्या कार्यक्रमात उपस्थित असतात. परंतु भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवाराच्या कार्यक्रमास अनुपस्थिती दाखवत आहेत. शिवाय महाविकास आघाडीच्या कार्यक्रमात उपस्थित न राहता समाजवादी पक्षाच्या कार्यक्रमास ते पोहोचतात. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे. खासदार सुरेश म्हात्रे भिवंडी पूर्वेत लक्ष देत आहेत तर भिवंडी पश्चिम मध्ये दुर्लक्ष का करत आहेत असा प्रश्न उपस्थित होतोय.
खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांच्या या वागणुकीमुळे भिवंडी पश्चिमचे उमेदवार दयानंद चोरगे म्हणाले की, "जर खासदार म्हात्रे महाविकास आघाडीत राहून दुसऱ्यांना साथ देत असतील तर मी ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष आहे आणि शहापूर व मुरबाड विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष निवडणूक लढवत आहे त्या ठिकाणी कार्यकर्ते त्यांना मदत करणार नाहीत. यासंदर्भात वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना माहिती कळवण्यात आली आहे."
भिवंडी पश्चिमेत चौरंगी लढत
भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होत आहे. काँग्रेस बंडखोर विलास पाटील व समाजवादीचे रियाज आजमी तसेच एमआयएम पक्षाचे वारिस पठाण निवडणुकीच्या रिंगणात असल्याने ही निवडणूक अतिशय रंगतदार व चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन वेळा निवडून आलेल्या भाजपच्या उमेदवाराला तिसऱ्यांदा संधी मिळते की पहिल्यांदा निवडणूक लढणाऱ्या महाविकास आघाडीच्या उमेदवारास संधी मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र समाजवादी पक्ष आणि बंडखोर यांच्यामुळे मात्र महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे हे नक्की. त्यामुळे जनता कोणाच्या बाजूने कौल देते आणि गुलाल कोण उधळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
ही बातमी वाचा: