बुलढाणा : रविकांत तुपकरांचा एबीफॉर्म तयार होता, मात्र बुलढाण्यातील काहींनी मातोश्रीवर दहा खोके पोहचविले आणि रविकांत यांचा पत्ता कट झाल असा आरोप शिंदे गटाचे नेते आणि बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय गायकवाड यांनी केला. नोटबंदी काळात एका उपजिल्हाधिकाऱ्यांनी एक हजार कोटींच्या नोटा जमवल्या आणि पाचशे कोटीच वर पाठवले आणि नोकरी सोडून दिली असा आरोप संजय गायकवाड यांनी केला. महाविकास आघाडीकडून जयश्री शेळके या निवडणूक लढवत असून त्यांचे पती सुनील शेळके हे माजी प्रशासकीय अधिकारी आहेत. त्यांच्यावर संजय गायकवाड यांनी थेट आरोप केला. 


रविकांत तुपकरांचा पत्ता कट


शेतकरी नेते रविकांत तुपकर हे मातोश्रीवर गेले होते. त्यावेळी त्यांना बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळणार होती. एबी फॉर्मही तयार होता. मात्र रात्रीतून बुलढाण्यातील काही लोक मातोश्रीवर दहा खोके घेऊन गेले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी रविकांत तुपकर यांचा पत्ता कट झाला.


सुनील शेळकेंनी 500 कोटी कमावले


संजय गायकवाड यांनी महाविकास आघाडीच्या बुलढाण्याच्या उमेदवार असलेल्या जयश्री शेळके यांचे पती सुनील शेळके यांच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, नोटबंदीच्या काळात मुंबईच्या लोकांनी जयश्री शेळके यांच्या राजश्री शाहू बँकेत नोटा बदलण्यासाठी एक हजार कोटी रुपये जमा केले होते. मात्र यांनी 500 कोटीच वर पाठवले. त्यावेळेस सुनील शेळके हे उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत होते. नंतर त्यांनी त्यानंतर नोकरी सोडून दिली. आज-काल मुलांना नोकरी मिळत नाही. मात्र उपजिल्हाधिकारी पदावरचा माणूस नोकरी सोडूच कशी शकतो? 


संजय गायकवाड यांनी मातोश्रीवर आणि जयश्री शेळके यांचे पती सुनील शेळके यांच्यावर 500 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.