भिवंडी : रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानात फळांचा ज्यूस विकणारा विक्रेता सडलेल्या फळांपासून ज्यूस तयार करत असल्याचा खळबळजनक व्हिडीओ सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ कल्याण - भिवंडी मार्गावरील साईबाबा मंदिराच्या शेजारी असलेल्या ज्यूस सेंटरचा असल्याचं समोर आलं आहे.
भिवंडीत राहणारे काही दक्ष तरुण त्या ज्यूस सेंटरमध्ये गेले होते. त्यावेळी त्या तरुणांचे ज्यूस सेंटर वरील ठेवलेल्या विविध फळांकडे लक्ष गेले असता त्यामध्ये काही सडकी फळंही असल्याने दिसून आलं. त्या तरुणांनी सडलेल्या फळांचा व्हिडीओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करून तो व्हायरल केल्याने ही घटना समोर आली आहे. या व्हिडीओमध्ये ज्यूस विक्रेत्याच्या हातात सडलेले अननस दिसत आहे. सदरील ज्यूस सेंटर चालक या अननसाचं ज्यूस बनवत होता असा दावा व्हिडीओ चित्रीकरण करणाऱ्या तरुणाने केला आहे. शरीराला चांगला थंडावा मिळावा म्हणून आपण ज्यूस पिण्यासाठी जातो. मात्र ज्यूस सेंटर चालक कशा पद्धतीने सडक्या फळांचा वापर करून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करत आहेत हे व्हायरल व्हिडीओतून दिसून येतं.
विशेष म्हणजे जेव्हा हा तरुण व्हिडीओ तयार करीत होता तेव्हा ज्यूस सेंटरच्या कामगाराने हे अननस फेकून दिले. दुसरीकडे हा व्हिडीओ समोर येताच परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. त्यानंतर काही वेळाने ज्यूस सेंटरवर गोधंळ उडाला असता आणखी काही तरुण या ठिकाणी आले आणि त्यांनी ज्यूस सेंटर चालकाला सेंटर बंद करण्यास भाग पाडले. शिवाय त्याच्या डोक्यावर फळांचा ज्यूस ओतला आणि मारहाण करण्यात आल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.
या फळविक्रेत्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी स्थानिक नागरिकांकडून मागणी करण्यात येत आहे. मात्र अजूनपर्यंत कोणीही तक्रार न दिल्यामुळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झालेली नाही. तर दुसरीकडे या फळ विक्रेत्याने सांगितले की हे फळ खराब निघाले नाही, त्यांना बाजूला ठेवण्यात आले होते आणि व्यापाऱ्याला माहिती दिली. सध्या शांती नगर पोलीस ठाण्यात या ज्यूस विक्रेत्याला बोलावण्यात आले आहे आणि त्यांची चौकशी केली जात आहे.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मात्र महानगरपालिकेने घटनास्थळी दाखल होत या दुकानदारावर कारवाई करत फळविक्रेताचा दुकान सील करण्यात आला असून त्याचे हात गाडी जेसीबी च्या साह्याने तोडण्यात आली आहे.