Bhiwandi News : तेलाचा पेटता दिवा पडल्याने लागलेल्या आगीत संपूर्ण घर (House) जळून खाक झाल्याची घटना भिवंडीत (Bhiwandi) घडली आहे. भिवंडी-शहापूर तालुक्याच्या सीमेवरील वेहलोंडे या गावात ही दुर्घटना घडली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु संपूर्ण घर जळून खाक झाल्याने मोठं नुकसान झालं आहे.


कशी घडली दुर्घटना?


वेहलोंडे या गावात काल (8 मार्च) रात्रीच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या गावातील सुभाष वेखंडे यांचे कौलारु घर होतं. त्यांच्या घरच्या दर्शनी भागात किराणा दुकान होतं. दुकानात तेलाचा दिवा लावला होता. हा तेलाचा दिवा रात्री साडेनऊच्या सुमारास पडला आणि आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्र रुप धारण करत आगीच्या ज्वालांनी संपूर्ण घर वेढले. लाकडी कौलारु घर असल्याने लागलेली आग विझवण्यासाठी ग्रामस्थांचे प्रयत्न तोकडे पडले. यानंतर वाशिंद इथल्या जिंदाल कंपनीची अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग तर आटोक्यात आणली पण तोपर्यंत या आगीत संपूर्ण घर जळून खाक झालं होतं. या आगीत घरातील सर्व साहित्य, मौल्यवान वस्तू, कपडे, धान्य हे सर्व जळून खाक झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.


उंदराने वात पळवल्यामुळे घराला आग लागल्याच्या यापूर्वीच्या घटना


भंडारा : दरम्यान दिव्याची पेटत्या वातीमुळे घरात आग लागल्याच्या घटना यापूर्वीही अनेक ठिकाणी घडल्या आहे. उंदराने देव्हाऱ्यातील दिव्याची पेटती वात पळवून ठिणगी पडून अशा दुर्घटना झाल्या आहेत. मागील वर्षी मे महिन्यात दिव्याची पेटती वात उंदराने पळवल्याने घराला आग लागून 70 हजाराचे संसारोपयोगी साहित्य बेचिराख झाल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील मांढळ इथे घडली होती. आगीत घरातील साहित्य खाक झाले. अन्नधान्य व इतर संसारोपयोगी साहित्याची चक्क राखरांगोळी झाली. 


पुणे : तर मागील वर्षी जानेवारी महिन्यात पुण्यातील चिखलीमध्ये उंदराने दिव्याची पेटती वात पळवल्याने घराचं मोठं नुकसान झालं होतं. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीमुळे घरातील सुमारे ५० हजार रुपयांचं नुकसान झालं.


सोलापूर : याशिवाय डिसेंबर 2020 मध्ये सोलापूरच्या करमाळा तालुक्याती मिरगव्हाण गावातही असचा प्रकार घडला होता. अतिशय धार्मिक असलेल्या आप्पा वायसे यांच्या घरात चोवीस तास दिवा तेवत असायचा. परंतु याच दिव्याने त्यांचा घात झाला आणि भर दुपारी संपूर्ण घरसंसाराची होळी झाली. दुपारी घरातील मंडळी शेतात काम करुन घरात परत आली असताना एका कोपऱ्यात घर पेटलं होतं. घरात आप्पा वायसे त्यांची पत्नी वडील आणि दोन मुले होती. शेजारी ओरडत आल्यावर याना आग लागल्याचे समजले आणि सर्वांनी घराबाहेर धाव घेतली. सकाळी पूजा केल्यावर देव्हाऱ्यात असलेल्या दिव्याची वात उंदराने पळवली आणि घराला आग लागली. 


अग्निशमन दलाचं आवाहन


दरम्यान घरात कोणीही नसताना दिवा लावून ठेवू नये. तसंच घरात उंदीर असल्यास त्याचा वेळीच बंदोबस्त करावा, असं आवाहन अग्निशमन दलाकडून करण्यात आलं आहे.