ठाणे : बदलापूर येथील एका शाळेत दोन चिमुरड्यांवर अत्याचार झाले होते. त्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांसोबत झालेल्या एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला. यामध्ये काही पोलीस देखील जखमी झाले आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून एन्काऊंटरबाबत पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. दुसरीकडे ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के, शिवसेनेच्या महिला पदाधिकारी माजी आमदार मनीषा कायंदे, माजी नगरसेविका शितल म्हात्रे यांनी ठाण्याती ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी पोलिसांची विचारपूस केली. यावेळी खासदार नरेश म्हस्के यांनी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला तुमची विचारपूस करण्यासाठी पाठवलं आहे. आपलं संरक्षण करण्याऱ्या पोलिसांना काही कमी पडू देऊ नका, असं त्यांनी आम्हाला सांगितल्याचं म्हस्के यांनी पोलिसांना सांगितलं. तर, शितल म्हात्रे यांनी मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी तुमच्यावर खुश आहेत, राज्यातील सर्व महिला तुमचं आभार मानत आहेत, असं म्हटलं. 


पोलिसांच्या शौर्यावर संशय व्यक्त करण हे दुर्दैव : नरेश म्हस्के 


बदलापूर अत्याचारातल्या आरोपीने पोलिसाची रिव्हॉल्वर हातात घेऊन पोलिसांवरच गोळीबार केला. तीन पोलीस त्यात जखमी आहेत. पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला आणि  त्यात आरोपीचा मृत्यू झालाय.  परंतु, विरोधक कुठलीही माहिती न घेता या घटनेवर प्रतिक्रिया देत सुटले आहेत. एन्काऊंटर की हत्या असा प्रश्न उपस्थित करून पोलिसांच्या शौर्यावर संशय व्यक्त करणे हे दुर्दैव आहे, असं नरेश म्हस्के म्हणाले.  


जखमी पोलीस अधिकाऱ्याच्या बाबतीत विरोधकांना काही घेणं देणं नाही. पण, अक्षय शिंदे मारला गेला याचं त्यांना दुःख होतंय. विरोधकांच्या या दुटप्पी भूमिकेमुळे पोलिसांच्या मनोधैर्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांचं मनोबल कायम राहावं, त्यांच्या पराक्रमाचं कौतुक व्हावं तसंच महाराष्ट्रातील जनता त्यांच्या पाठीशी आहे हे दाखविण्यासाठी आम्ही ज्यूपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या पोलिसांची भेट घेतली, असं नरेश म्हस्के म्हणाले. त्यांनी पोलिसांना  मनौधर्य खचू देऊ नका,शिवसेना तुमच्यासोबत आहे, असं म्हटलं. अक्षय शिंदेचा न्याय निसर्गानं केला आहे. करावं तसं भरावं, असंही नरेश म्हस्के म्हणाले.


आधी साडेचार वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या दुर्दैवी घटनेचे विरोधकांनी राजकारण केले. आता तो नराधम पोलिसांच्या चकमकीत मारला गेला तर त्यावरूनही राजकारण करत आहेत, असा हल्लाबोल नरेश म्हस्के यांनी केला. आता पोलिसांवर आरोप करणे ही दुटप्पीपणाची हद्द झाली आहे. या आरोपीला भरचौकात फाशी द्या, अशी मागणी करणाऱ्यांना आता त्याच्याविषयी  एवढी आपुलकी कशी वाढली ? असा सवाल देखील म्हस्के यांनी केला.


इतर बातम्या :


अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर होण्याआधी तळोजा कारागृहात काय काय घडलं?, वडिलांनी सर्व सांगितलं!


Akshay Shinde Encounter : रस्ता क्रॉस करतानाही तो हात पकडायचा, तो गोळीबार कसा करू शकतो? एन्काऊंटर झालेल्या अक्षय शिंदेची आई काय म्हणाली?