Akshay Shinde Encounter: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde) याचा सोमवारी संध्याकाळी मुंब्रा परिसरात झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. अक्षयने पोलिसांकडील बंदूक हिसकावून घेऊन एका पोलीस कर्मचाऱ्यावर गोळी झाडली. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे (Akshay Shinde Encounter) याचा मृत्यू झाला.


अक्षय शिंदे (Akshay Shinde) याचे आई-वडील सोमवारी दुपारीच त्याला तळोजा कारागृहात जाऊन भेटून आले होते. ते पावणेचारच्या सुमारास तुरुंगातून बाहेर पडले. त्यानंतर पोलिसांनी एका प्रकरणाच्या चौकशीसाठी अक्षय शिंदे याला बदलापूरला नेले. यानंतर अक्षयच्या एन्काऊंटरची माहिती वृत्तवाहिन्यांवरील बातम्यांमधून समजल्याची माहिती अक्षयच्या चुलत्यांनी दिली, असं अण्णा शिंदे (अक्षयचे वडील) यांनी सांगितले. 


वडिलांसह अक्षय शिंदेचे नातेवाईक काय म्हणाले?


बदलापूर अत्याचार प्रकरणातील संस्थाचालक आणि इतर आरोपींना वाचविण्यासाठी अक्षयचा एन्काऊंटर केल्याचा आरोप अक्षय शिंदेच्या नातेवाईकांनी केला आहे. अक्षयचा एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी देखील अण्णा शिंदे (अक्षयचे वडील) यांनी केली. नवी मुंबईतील तळोजा कारागृहात आरोपी अक्षयला भेटण्यासाठी त्याचे आई- वडील सोमवारी सकाळी गेले होते. मुलाला भेटण्याचे टोकन मिळाले नव्हते. त्यांना दुपारी 3.30 वाजता येण्यास सांगण्यात आले. साधारण 3.45 वाजता ते गेल्यानंतर अक्षयची आणि आमची 20 मिनिटांसाठी भेट झाल्याची माहिती अण्णा शिंदे यांनी दिली.  माझा मुलगा असे करूच शकत नाही. रस्ता क्रॉस करतानाही तो माझा हात पकडायचा, तो गाड्यांना घाबरायचा. असा मुलगा पोलिसांची बंदूक कशी काय हिसकावून घेऊ शकतो? असा सवाल अक्षयच्या आईने उपस्थित केला. 


त्या पेपरमध्ये काय लिहिलेलं?


अक्षयचे आई-वडील तुरुंगात गेले होते. त्यांची आणि अक्षयची 20 मिनिटांची भेट झाली. तेव्हा अक्षयने आई-वडिलांना पैसे पाठवायला सांगितले. त्यासाठी अक्षयने आई-वडिलांना एक नंबर दिला होता. त्यांचे बोलणे सुरु असताना अक्षयच्या हातात एक मोठा पेपर होता. कोणीतरी आपल्याला हा पेपर लिहून दिल्याचे अक्षयने आईला सांगितले. त्या पेपरमध्ये काय लिहलंय, असं अक्षयने आईला विचारले. आईने अक्षयला विचारले की, हा पेपर तुला कोणी दिला? त्यावर अक्षयला व्यवस्थित उत्तर देता आले नाही. अक्षयच्या आईने तो पेपर बघितला, पण त्यामध्ये काय लिहलंय, ते तिला वाचता आले नाही. तो पेपर पाहून अक्षयच्या आई-वडिलांना शंका आली. तेव्हा आईने म्हटले की, कोणी काय दिलं असेल ते फेकून दे. पण त्या कागदावर काय लिहून दिलं होतं, हे अक्षयच्या आई-वडिलांनाही शेवटपर्यंत समजले नाही, अशी माहिती अक्षयच्या काकांनी दिली. 


संबंधित बातमी:


Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेला संपवणारे एन्काऊंटर स्पेशालिस्ट संजय शिंदे कोण?