ठाणे : भिवंडीत  भटक्या कुत्र्यांची दहशत वाढत आहे. भटकी कुत्री आता माणसांवरही हल्ले करत आहेत. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी होण्याचे प्रमाण वाढले आहेच शिवाय काही जणांना प्राणही गमवावे लागले आहेत. जिल्ह्यातील शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही कुत्र्यांचा त्रास वाढला आहे.  एप्रिल 2023 ते जुलै 2024  या वर्षभरात जिल्ह्यात जवळपास  14  हजार 216  श्वानदंशाच्या घटना घडल्या आहेत.भिवंडी  महानगरपालिका  हद्दीतील  भटक्या  कुत्र्यांची  नसबंदी  करणारे  श्वान  निर्भजीकरण केंद्र  मागील  2012  पासून  बंद  असल्यामुळे  भिवंडी  शहरात  भटक्या  कुत्र्यांची  हजारोच्या  संख्येत  वाढ होऊन  त्यामध्येही   पिसाळलेल्या  कुत्र्यांची संख्या वाढीस लागल्याच या घटनेनंतर दिसून आले आहे.


भिवंडी  शहरात  भटक्या  कुत्र्यांचा  त्रास  बहुतांश  वेळा  रात्रीच्या  वेळी  नागरिकांना  दुचाकी  चालकांना  होतो.   या  भटक्या  कुत्र्यांपैकी  काही  पिसाळल्याने  अनेकांना  दंश  करण्याच्या  घटना  भिवंडी  शहरात  वाढीस  लागलेल्या  आहेत.  7  आणि   8   जुलै  या  दोन  दिवसात  तब्बल  135  जणांना  श्वान  दंश  झाल्याची  घटना घडली होती.    कुत्र्याच्या  हल्ल्यात  जखमी  झालेल्यांमध्ये   सर्वाधिक  लहान  मुलामुलींचा  समावेश  असून  त्यामधील दोघांची  प्रकृती  गंभीर  होती.  खळबळजनक  बाब  म्हणजे  गेल्या   जून  महिन्या  मधील  तीस  दिवसात  886 जणांना  भटक्या  कुत्र्यांनी  चावा  घेऊन  जखमी  केल्याची    माहिती  इंदिरा  गांधी  स्मृती  उपजिल्हा रुग्णालयाच्या  अधिक्षका  डॉ.  माधवी  पंधारे  यांनी  दिली  आहे.


रुग्णालयात उपचार 


7  जुलै  रोजी  भिवंडी  शहरातल्या  कामतघर  परिसरात  60  नागरिकांना  भटक्या कुत्र्याने  चावा  घेऊन  जखमी  केले. तर  शांतीनगर भागात आठ जुलै रोजी 45 जणांना एकाच भटक्या कुत्र्याने चावा घेऊन जखमी केले.  या गंभीर जखमीमध्ये शांतीनगर भागात राहणाऱ्या लायबा शेख या चार वर्षीय मुलीचा समावेश होता. सुरुवातीला तिला भिवंडीतील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याने दुसऱ्या दिवशी ठाण्यातील सिव्हिल हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केल्यानंतर तिच्यावर जखमांच्या ठिकाणी शस्त्रक्रिया करण्यात येऊन तिला तीन दिवसात घरी सोडण्यात आले. मात्र तीन दिवसापूर्वीच तिची पुन्हा प्रकृती गंभीर झाल्याने तिला पुढील उपचारासाठी मुंबईतील सायन रुग्णालयात दाखल केलं. मात्र 25 ऑगस्ट रोजी उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला.


पालिका उपाययोजना करत नाही


यासंदर्भात समाजवादी पक्षाचे भिवंडीतील आमदार रईस शेक यांनी 8 जुलै म्हणजे घटनेच्या दिवशी पावसाळी अधिवेशनात भटक्या कुत्र्यावरील पालिका काहीच उपाययोजना करीत नसल्याने प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर सभागृहात चर्चा होऊन पालिकेला उपाययोजनेसाठी निर्देशही दिल्याची माहिती आमदार शेख यांनी दिली आहे. मात्र त्यावर काहीच उपाययोजना पालिका अधिकाऱ्यांनी केलं नसल्यानं त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली असून त्यासाठी 27 ऑगस्ट रोजी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार करणार असल्याचेही सांगितले तर मयत मुलीचे  आजोबा यांनी यापूर्वीही पालिका प्रशासनाला भटक्या कुत्र्याला आळा घालण्यासाठी निवेदन दिले होते. मात्र त्यावर कार्यवाही न झाल्याने माझ्या नातीला कुत्राने चावा घेऊन मारले तसेच  ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात नातीवर योग्य उपचार येथील डॉक्टरांनी  केले नसल्यानेच मुलीचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.


वर्षभरात कुत्र्यांच्या हल्ल्यांची संख्या वाढली


एप्रिल 2023 ते जुलै 2024 या कालावधीत भिवंडीत तब्बल 14,216 लोकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे, ज्यामध्ये लहान मुलांचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. दर महिन्याला शेकडो नागरिक या हल्ल्यांमध्ये जखमी होत आहेत. गेल्या वर्षभरात कुत्र्यांच्या हल्ल्यांची संख्या चिंताजनकपणे वाढली आहे. एप्रिल 2023 मध्ये 628 जणांना, मे महिन्यात 662, जुनमध्ये 504, जुलैमध्ये 987, ऑगस्टमध्ये 1400, सप्टेंबरमध्ये 680, ऑक्टोबरमध्ये 764, नोव्हेंबरमध्ये 746, डिसेंबरमध्ये 926, जानेवारी मध्ये 930, फेब्रुवारीत 956, मार्चमध्ये 1102, एप्रिल  मध्ये 1100, मे महिन्यात 1045, जुनमध्ये 886 आणि जुलै  मध्ये 900 नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे.या घटनेमुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आणि महानगरपालिका प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त होत आहे. कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर आणि त्यांच्या हल्ल्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी सर्वत्र होत आहे.


नागरिकांचा महानगरपालिकेवर संताप


2008 ते 2012 दरम्यान, मनपा प्रशासनाने अंबरनाथच्या ॲनिमल वेल्फेअर सोसायटीला कुत्र्यांच्या नसबंदीचं कंत्राट दिलं. त्या काळात 18 हजार 868 कुत्र्यांची नसबंदी 1140 रुपये प्रति कुत्रा या दराने करण्यात आली होती. मात्र, याच दरम्यान खाडीपार-कटई परिसरात नऊ कुत्र्यांना रॉकेल तेल टाकून जाळण्याचा प्रकार घडला. हा प्रकार निजामपूर पोलिस ठाण्यात नोंदवला गेला असला तरी, त्यावर काहीच कार्यवाही न झाल्याने नसबंदीचं काम करणाऱ्या ठेकेदाराला नोटीस देऊन हे काम बंद करण्यात आलं. त्यानंतर तब्बल सहा वर्षांच्या दीर्घ काळानंतर मनपा प्रशासनाने शहरातील एकूण 8519 कुत्र्यांच्या नसबंदीच्या कामासाठी 30 लाख रुपयांचा प्रस्ताव तयार करत मार्च 2018 पर्यंत टेंडर काढलं. मात्र, आतापर्यंत टेंडर प्रक्रियेत कोणत्याही संस्थेने भाग घेतला नाही त्यामुळे कुत्र्यांचे नसबंदी 2012 पासून बंद आहे आणि महानगरपालिकेकडे  किती कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली, याचा डेटा कोणाकडेच नाही. यामुळे भिवंडी शहरात मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्याने आता हे भटके कुत्रे नागरिकांना लक्ष करीत आहेत त्यामुळे नागरिकांचा महानगरपालिकेवर संताप व्यक्त होत आहे.