मुंबई : महिलांना जुळी मुलं का होतात याचे अनेक तर्कवितर्क लावले जातात. महिलेच्या जवळच्या नातेवाईकांपैकी कोणाला जुळी मुलं असतील तर तिला जुळी मुलं होण्याची शक्यता जास्त असते, असं म्हटलं जातं. पण आतापर्यंत जुळी मुलं होण्याला कारणीभूत ठरणाऱ्या जनुकांचा शोध लागला नव्हता.
परंतु जुळी मुलं कशी होतात हे ओळखण्यासाठी नेदरलँडच्या एका विद्यापीठातील संशोधकांनी एक निष्कर्ष काढला आहे. या शास्त्रज्ञांचं संशोधन अमेरिकेच्या ह्यूमन जेनेटिक्स नावाच्या नियतकालिकात प्रकाशित करण्यात आलं आहे.
"महिलांना जुळी मुलं का होतात याचं कारण शोधण्यात अनेकांना रस असतो. पण याचं उत्तर अत्यंत सोपं आहे. आमच्या निष्कर्षामुळे जुळी मुलं जन्माला येण्यास कारणीभूत ठरणारे जीन्स (जनुक) ओळखण्यात यश आलं आहे", असं नेदरलँडच्या अॅम्स्टरडॅममधील व्रिजे विद्यापीठातील जीवशास्त्र विभागाच्या मानसशास्त्रज्ञ डोरेट बूमस्मा यांनी सांगितलं.
या निष्कर्षांमुळे संशोधकांना आशा आहे की, ते अशी अनुवांशिक चाचणी (जेनेटिक टेस्ट) विकसित करतील, जेणेकरुन महिलांना जुळी मुलं कशी होतात ते ओळखता येईल.