न्यू यॉर्क : फेसबुकने फिनलंडमध्ये राहणाऱ्या एका 10 वर्षांच्या बालकाला 10 हजार डॉलर म्हणजे अंदाजे 6 लाख 65 हजार रुपयांचं बक्षिस दिलं आहे. फेसबुकचं फोटो शेअरिंग अॅप इन्स्टाग्राममधला एक बग शोधल्याबद्दल हे इनाम देण्यात आलं आहे.


 
जानी नावाच्या या बालकाने इन्स्टाग्राममधला हा बग आपणहून शोधून काढल्याची माहिती वेन्चरबीट.कॉम या टेक्नॉलॉजी वेबसाईटने दिली आहे. इन्स्टाग्रामवर अकाऊण्ट ओपन करण्यासाठी तुमचं वय 13 वर्ष असणं आवश्यक आहे, मात्र 10 वर्षांच्या या बालकाने चक्क
या सोशल साईटमधल्या उणिवा शोधल्याने सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं आहे.

 

काय आहे हा बग ?

जानीने शोधलेल्या या बगमुळे तुम्ही इन्स्टाग्रामवर कोणत्याही यूझरने कोणाच्याही फोटोवर केलेली कमेंट डिलीट करु शकत होतात. या चिमुरड्याने ईमेलद्वारे या बगची माहिती फेसबुकला दिली आणि पुरावा म्हणून इन्स्टाग्रामवरील फेसबुकच्या एका टेस्ट अकाऊण्टवरील
कमेंट डिलीट करुन दाखवली.

 
'मी कोणाचीही कमेंट डिलीट करु शकत होतो, अगदी जस्टिन बिबरसारख्या परफॉर्मरचीही' अशी प्रतिक्रिया जानीने दिली. फेब्रुवारीमध्ये हा बग फिक्स करण्यात आला आणि मार्चमध्ये त्याला पारितोषिक देण्यात आलं.

 
भविष्यात जानीला सिक्युरिटी रिसर्चर होण्याची इच्छा आहे. 'हा माझा ड्रीम जॉब असेल, सायबर सुरक्षा अत्यंत महत्त्वाची असते' असं तो म्हणतो. जानीने ही रक्कम त्याच्या दोन भावांसाठी नवीन बाईक, फुटबॉल गेअर आणि कॉम्प्युटर घेण्यासाठी वापरली आहे.