नवी दिल्ली : जगभरात फेसबुकचे कोट्यवधी युजर्स आहेत. भारतातही फेसबुक तितकेच प्रसिद्ध आहे. केम्ब्रिज अॅनालिटिकाने फेसबुकवरील युजर्सच्या खासगी माहितीचा गैरवापर केल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर, फेसबुकच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. केम्ब्रिज अॅनालिटिका ही कंपनी सोशल मीडिया मॅनेजमेंटची कामं करते. विशेष म्हणजे, भारतातील पक्षांनीही आपापल्या प्रचारासाठी या कंपनीची निवड केली होती. त्यामुळे अपरिहार्यपणे भारतातील फेसबुक युजर्सच्या खासगी माहितीच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे.


फेसबुकचा डेटा चोरी करण्याचा आरोप असणाऱ्या केम्ब्रिज अॅनालिटिका कंपनीच्या भारतातही कंपन्या आहेत. ‘स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन्स लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘ओवलेने बिझनेस इंटेलिजियन्स’ अशा या भारतातील दोन कंपन्या आहेत. या कंपन्यांनी भाजप, काँग्रेस आणि जेडीयू यांच्यासाठी भारतात काम केले आहे.

आता यावरुन देशात आरोप-प्रत्यारोपांची फैरी झडत आहेत. भाजपने काँग्रेसवर, तर काँग्रेसने भाजपवर आरोप केले आहेत. देशाच्या सुरक्षेशी काँग्रेस खेळतेय, असा आरोप करणाऱ्या भाजपवर काँग्रेसने पलटवार करत म्हटलेय की, भाजपने स्वत: निवडणुकीसाठी केम्ब्रिज अॅनालिटिकाची मदत घेतली आहे.

केम्ब्रिज अॅनालिटिकाची भारतातही पाळेमुळे

‘स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन्स लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘ओवलेने बिझनेस इंटेलिजियन्स’ अशा केम्ब्रिज अॅनालिटिकाच्या दोन सहयोगी कंपन्या भारतात आहेत. केम्ब्रिज अॅनालिटिकावर डेटा चोरीचा आरोप झाल्यानंतर तातडीने भारतातील ओवलेने बिझनेस इंटेलिजियन्सला ब्लॉक केले. या वेबसाईटवर भाजप, काँग्रस आणि जेडीयू हे पक्ष आपले क्लाएंट असल्याचा उल्लेख ओवलेने बिझनेस इंटेलिजियन्सने केला होता.

विशेष म्हणजे, ओवलेने बिझनेस इंटेलिजियन्स कंपनीचे प्रमुख अमरीश त्यागी हे आहेत. अमरीश हे जेडीयूचे वरिष्ठ नेते के. सी. त्यागी यांचे पुत्र आहेत.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, अमरीश आणि केम्ब्रिज अॅनॅलिटिकाचे निलंबित सीईओ अलेक्झांडर निक्स गाझियाबादच्या स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन्स लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आहेत.

“2010 साली बिहार विधानसभा निवडणुकीत इलेक्टोरल अनॅलिसिस केम्ब्रिज अॅनॅलिटिकने केले होते. ग्रामीण भागात जेडीयूचा जनाधार वाढवण्याची जबाबदारीही या कंपनीवर होती. समर्थकांचा उत्साह वाढवण्यासाठी काम करत होती. जिथे टार्गेट केले होते, तिथे 90 टक्के जागांवर विजयही मिळाला होता.”, अशी माहिती इंडियन एक्स्प्रेसने दिली आहे.

2010 सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजप-जेडीयू युतीने बिहारमध्ये मोठा विजय मिळवला होता. 243 जागांपैकी नितीश कुमार यांच्या जेडीयूने 115 जागा, तर भाजपने 91 जागा जिंकल्या होत्या.

फेसबुक लीक नेमकं काय प्रकरण आहे?

फेसबुकच्या 5 कोटी युजर्सची खासगी माहिती विनापरवानगी मिळवून, त्याचा राजकीय नेत्यांच्या फायद्यासाठी वापरली. केम्ब्रिज अॅनालिटिकाने अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प आणि ब्रेक्सिटसाठी फेसबुक युजर्सच्या खासगी माहितीचा वापर केला. त्यामुळे जगभरातील फेसबुक युजर्सच्या खासगी माहितीच्या सुरक्षेवर आणि

केम्ब्रिज अॅनालिटिकाला फेसबुकने आपल्या प्लॅटफॉर्मवरुन काढले आहे. तिकडे केम्ब्रिज अॅनालिटिकानेही त्यांच्या सीईओला निलंबित केले आहे.

फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग यानेही माफीनामा सादर करत, चुकीची जबाबदारी स्वीकारली. शिवाय, यापुढे सुरक्षिततेची हमी दिली. त्याचसोबत, आतापर्यंत जवळपास 2 लाख 70 हजार युजर्सनी अॅप डाऊनलोड करत आपली खासगी माहिती शेअर केल्याची कबुलीही फेसबुकने दिली.