मुंबई : व्हॉट्सअॅप मेसेंजरने फेक पोस्टबद्दल जनजागृती करण्यासाठी तब्बल 120 कोटी रुपये खर्च केले असल्याची माहिती मिळत आहे. मागील काही दिवसांपासून व्हॉट्सअॅप फेक न्यूजबाबत टीव्ही, रेडिओ आणि वृतपत्राच्या जाहिरातीतून जनजागृती करत आहे. व्हॉट्सअॅपच्या फेक पोस्टमुळे देशात अनेक घटना घडल्यानंतर शासनाने व्हॉट्सअॅपला नोटीस पाठवली होती. त्यानंतर व्हॉट्सअॅपकडून हे पाऊल उचललं गेलं.
व्हॉट्सअॅपने प्रिंट मीडियाच्या जाहिरातीवर सर्वाधिक खर्च केले असल्याचं कळतयं. दुसऱ्या टप्प्यामध्ये जाहिरातीचे प्रमाण वाढवण्यात येणार आहे. आजपासून या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी जास्तीत जास्त प्रमाणात फेक न्यूजवर आळा घालण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.
या जाहिरातीला विविध 10 भाषांमध्ये प्रसारीत करण्यात येणार असल्याची माहिती व्हॉट्सअॅपकडून देण्यात आली. फेक पोस्टवर निर्बंध घालण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त पैसा जाहिरातीवर खर्च करत आहोत. आम्हाला विश्वास आहे की, येणाऱ्या काळात देशाच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत आम्ही पोहोचू. आतापर्यंत आम्ही 10 कोटी लोकांपर्यंत फेक न्यूज पसरवू नये हा संदेश पोहोचवला आहे, अशी माहिती व्हॉट्सअॅपच्यावतीने देण्यात आली आहे.
अफवांमुळे 31 बळी
भारतात एकूण 20 कोटी व्हॉट्सअॅप वापरकर्ते आहेत. त्यासोबतच पोस्टची सत्यता न पडताळता पोस्ट वायरल करणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. व्हॉट्सअॅपच्या फेक पोस्टमुळे जातीय दंगली सारख्या घटना घडल्या आहेत. अफवांमुळे जमावाकडून हत्या होण्याचं लोण देशभरात पसरलं होते. देशातील 10 राज्यांत एकूण 31 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. महाराष्ट्रातील धुळे जिल्हात अलिकडेच मुलं पळवल्याच्या संशयावरुन जमावाने पाच जणांचा बळी घेतला होता. तसेच गोवर-रुबेला लसीमुळे नपुंसकत्व येत असल्याची अफवा पसरल्याने देखील खळबळ उडाली होती. म्हणून अशा फेक पोस्टवर आळा घालने गरजेचे असल्याने व्हॉट्सअॅपने हे पाऊल उचलले आहे. काही दिवसापूर्वीच व्हॉट्सअॅपने फॉरवर्डेड मेसेज ओळखण्यासाठीचा नवीन फीचर देखीन अपडेट केला आहे.
फेक बातम्या ओळखण्याचे आवाहन
व्हॉट्सअॅपवरील फॉरवर्डेड मेसेज ओळखण्यासाठी पोस्टवरील उजव्या बाजूला एक चिन्ह देण्यात आले आहे. ते चिन्ह जाणून घेण्याचा प्रयत्न करा. ज्यामुळे बातमी खरी आहे की खोटी, हे ओळखण्यास मदत होईल. उदाहरणार्थ, ज्या संदेशाचे मुळ स्त्रोत माहित नसते, ज्यांचा पुरावा नसतो, असे फॉरवर्डेड मेसेजेस ज्यामुळे तुम्हाला संताप येतो, असे फोटो, व्हिडीओ, एवढेच नाही तर व्हॉईस रेकॉर्डिंगसुद्धा एडिट करुन तुमची दिशाभूल केली जाऊ शकते, असे जाहिरातीत म्हटले आहे.
इतर स्त्रोतांकडून तपासून घ्या
सत्य जाणून घेण्यासाठी ऑनलाईन सर्च करा आणि बातम्यांच्या विश्वसनीय साईट्सवरुन ही बातमी कुठून आली आहे, याचा शोध घ्या. तरी देखील शंका असेल तर सत्य शोधणाऱ्या वेबसाईट्स, विश्वासपात्र व्यक्ती किंवा लीडर्सकडून अधिक माहिती मिळवा, असे यात म्हटले आहे.
अफवांचा प्रसार थांबविण्यासाठी मदत करा
जर, तुम्हाला वाटत असेल की एखादी बातमी फेक आहे, तर लोकांना सांगा की शेअर करण्यापूर्वी ती तपासून पहा भले तुमच्या कितीही जवळची व्यक्ती असली तरी त्यांनी शेअर करण्याची विनंती केली आहे म्हणून उगीचच शेअर करु नका, असेही जाहिरातीत सांगितले आहे.
फेक पोस्टवर आळा घालण्यासाठी व्हॉट्सअॅपकडून 120 कोटी रुपये खर्च
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Jan 2019 12:42 PM (IST)
मागील काही दिवसांपासून व्हॉट्सअॅप फेक न्यूजबाबत टीव्ही, रेडिओ आणि वृतपत्राच्या जाहिरातीतून जनजागृती करत आहे. व्हॉट्सअॅपच्या फेक पोस्टमुळे देशात अनेक घटना घडल्यानंतर शासनाने व्हॉट्सअॅपला नोटीस पाठवली होती. त्यानंतर व्हॉट्सअॅपकडून हे पाऊल उचललं गेलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -