मुंबई : सोशल मिडीया तसेच इतर ऑनलाइन वेबसाईट आणि अॅप्सच्या माध्यामातून शेअर केल्या जाणाऱ्या 'पॉर्नोग्राफिक' मजकूराचा प्रसार रोखण्यासाठी सायबर तज्ज्ञांची मदत घेण्याचे पोलिसांनी ठरवले आहे. त्यासाठी देशभरातील पोलिस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण सध्या दिले जात आहे.


सध्या व्हॉट्सअॅप किंवा इतर मेसेजिंग अॅप्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर 'पॉर्नोग्राफिक' मजकूर शेअर केला जातो. लहान मुलांच्या अश्लील चित्रफिती, जोडीदारासोबतचे अश्लील व्हिडीओ, फोटो यांचा प्रसार ऑनलाइन अॅप्सच्या माध्यमातून केला जातो.  हा प्रसार रोखणे हे पोलिसांसमोरचे मोठे आवाहन ठरत आहे.

गुन्हेगारांकडून वापरले जाणारे ऑनलाइन मेसेजिंग अॅप्स 'एनक्रिप्टेड' असल्याने पोलिसांना गुन्हेगारांचा शोध घेणे अवघड जाते. बऱ्याचदा गुन्हेगारांकडून व्हिपीएन, खोट्या ओळखपत्राआधारे खरेदी केलेले सीम कार्ड , आयएमईआय क्रमांक बदलेले मोबाईल यांचा वापर केला जात असल्याने गुन्हेगाराची माहिती शोधणे कठीण जाते. तसेच या ऑनलाईन अॅप्सचे सर्व्हर बाहेरच्या देशांमध्ये असल्याने देखील ते वापरणाऱ्यांची माहिती लवकर मिळत नाही.

या कारणांमुळे पोलिसांनी सध्या सायबर तज्ज्ञांची मदत घेण्याचे ठरवले आहे. मोबाईल क्रमांकावरून तो वापरणाऱ्याचा शोध घेणे, काही वेळा गुन्हागारांकडून वापरल्या जाणाऱ्या 'व्हर्च्यूअल' क्रमांकाची माहिती काढणे यासारख्या गोष्टींचेही प्रशिक्षण पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात येत आहे.