नवी दिल्ली : व्हॉट्सअॅपने आपल्या प्लॅटफॉर्मवर मेसेजचा सोर्स माहिती करुन घेण्यासाठी सॉफ्टवेअर विकसित करण्यासाठी नकार दिला आहे. केंद्र सरकारने या प्रकारचं तंत्र विकसित करण्याची मागणी कंपनीकडे केली होती, जी व्हॉट्सअॅपने फेटाळली आहे.


व्हॉट्सअॅपचं सरकारला उत्तर

सरकारचं म्हणणं आहे, की असं तंत्र विकसित करावं, ज्यामुळे बनावट मेसेज कुणी पाठवला आहे, त्या मूळ सोर्सचं नाव माहित होईल. अफवांच्या आधारावर देशात अनेक ठिकाणी जमावाकडून निरपराध लोकांच्या हत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पाऊल उचललं आहे.

याबाबत व्हॉट्सअॅपच्या प्रवक्त्यांनी माहिती दिली आहे. या प्रकारचं सॉफ्टवेअर विकसित केल्यास मेसेज सिस्टम प्रभावित होईल आणि व्हॉट्सअॅपच्या खाजगी नियमांवरही त्याचा परिणाम होईल. शिवाय या तंत्राचा दुरुपयोग होण्याचीही शक्यता आहे. “आम्ही सुरक्षा कमकुवत होऊ देणार नाही”, असं व्हॉट्सअॅपने म्हटलं आहे.

''बँक तपशील असो किंवा इतर खाजगी माहिती, युझर्स व्हॉट्सअॅपचा वापर संवेदनशील माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी करतात. आमचं लक्ष्य भारतीयांसोबत मिळून त्यांना चुकीच्या माहितीपासून जागृत राहण्याबाबत प्रशिक्षण देणार आहोत. याच माध्यमातून युझर्सना सुरक्षित ठेवलं जाईल,'' असं व्हॉट्सअॅपने म्हटलं आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील सूत्रांच्या मते, सरकार या गोष्टीवर जोर देत आहे, की भडकाऊ मेसेज रोखण्याच्या दृष्टीने व्हॉट्सअॅपने प्रयत्न करावेत आणि असे मेसेज करण्याऱ्यांची माहिती मिळावी.

जगभरात व्हॉट्सअॅप युझर्सची संख्या दीड अब्ज आहे. भारत कंपनीसाठी सर्वात मोठं मार्केट आहे. भारतात 20 कोटींपेक्षाही जास्त व्हॉट्सअॅप युझर्स आहेत.