मुंबई : लोकप्रिय मेसेन्जिंग अॅप WhatsApp ने आपल्या प्रायव्हसी पॉलिसीत बदल केल्यानंतर आता यूजर्सनी नवे पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. WhatsApp च्या नव्या धोरणांचा फायदा हा इतर अॅपना होताना दिसतोय. याचमुळे गेल्या केवळ 72 तासात Telegram च्या यूजर्समध्ये अडीच कोटी नव्या यूजर्सची भर पडली आहे.
Telegram चे 50 कोटीपेक्षा जास्त मंथली अॅक्टिव्ह यूजर्स
कंपनीचे संस्थापक पावेल दुरोव यांनी सांगितलं की Telegram च्या मंथली अॅक्टिव्ह यूजर्सची संख्या 50 कोटीपेक्षा जास्त आहे. गेल्या 72 तासात अडीच कोटी नव्या यूजर्सनी Telegram डाउनलोड केलं आहे. कंपनीच्या मते जगभरातील अनेक लोक आता टेलिग्रामच्या वापराला प्राधान्य देताना दिसत आहेत. त्यामध्ये 38 टक्के यूजर्स हे आशियायी देशातील असून 27 टक्के यूजर्स हे यूरोप आणि 21 टक्के यूजर्स हे लॅटिन अमेरिकेतील आहेत. Telegram हे अॅप 2013 मध्ये सुरु करण्यात आलं होतं.
Telegram कडून WhatsApp च्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीची खिल्ली, ट्विट व्हायरल
हे आहेत खास फिचर्स
Telegram मध्ये असे काही खास फिचर्स आहेत जे WhatsApp मध्ये मिळत नाहीत. टेलिग्राममध्ये एक सीक्रेट चॅटचा पर्याय असतो. त्यासाठी यूजर्सना एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन सुरु करावे लागते. त्याचसोबत क्लॉउड स्टोरेजच्या मदतीने आपण आपले मेसेज, डॉक्यूमेन्ट आणि मीडिया फाइल्स स्टोअर करु शकतो. विशेष म्हणजे आपण अनेक डिव्हाइसमध्ये एकाच टेलिग्रामच्या अकाउंटचा वापर करु शकतो.
काय आहे WhatsApp ची प्रायव्हेट पॉलिसी?
WhatsApp च्या यूजर्सना कंपनीच्या नव्या प्रायव्हेट पॉलिसीला लवकरच मान्यता द्यावी लागणार आहे. जर या प्रायव्हेट पॉलिसीला मान्यता दिली नाही तर यूजर्स पुढच्या महिन्यातील 8 तारखेपासून WhatsApp चा वापर करु शकणार नाहीत. कंपनीच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीनुसार कंपनी आता यूजर्सची माहिती ही इतर कंपन्यांना विकू शकणार आहे आणि या धोरणाला यूजर्सने मान्यता द्यावीच लागेल अन्यथा त्यांचे अॅप काम करणे बंद होणार आहे.
Arattai | व्हॉट्सअॅपला मेड इन इंडिया पर्याय, Zoho चं 'अराट्टई' अॅप चर्चेत!
WhatsApp चे स्पष्टीकरण
कंपनीच्या नव्या प्रायव्हेट पॉलिसीला यूजर्सचा वाढता विरोध लक्षात घेता WhatsApp ला स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे. WhatsApp आणि फेसबुक त्यांच्या यूजर्सचे मेसेज वाचू शकणार नाहीत किंवा त्यांचे कॉल ऐकू शकणार नाहीत. यूजर्स जे काही शेअर करतील ते केवळ यूजर्समध्येच राहील. WhatsApp मधील व्यक्तिगत मेसेज एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शद्वारे सुरक्षित आहेत. या सुरक्षेशी WhatsApp तडजोड करणार नाही असं कंपनीने स्पष्ट केलं आहे.