मुंबई : देशात सध्या निवडणुकीची धामधूम आहे. पाच राज्यांमध्ये विधानभा निवडणुका, तर महाराष्ट्रात 10 महानगरपालिका आणि 25 जिल्हा परिषद निवडणुका आहेत. निवडणुकीत जिंकण्याची आशा बाळगत प्रत्येक उमेदवार जीवतोड मेहनत घेत प्रचार करत आहे. कुणी मतदारांना भेटून, कुणी सभा घेऊन, तर कुणी सोशल मीडियावरुन मतदारांपर्यंत पोहोचत आहे.
'निगेटिव्ह कॅम्पेनिंग'
2014 साली लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर केला गेला आणि सोशल मीडियाचं राजकीय पक्षांच्या गोटात कैकपटीने महत्त्व वाढलं. 2014 साली स्वपक्षाचा प्रचार करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर सुरु झाला खरा, पण आता या सोशल मीडियाचा वापर विरोधी उमेदवाराच्या 'निगेटिव्ह कॅम्पेनिंग'साठी केला जातोय. विशेष म्हणजे जवळपास सगळ्याच पक्षांकडून यासाठी खास 'वॉर रुम' तयार करण्यात आले आहेत. या वॉर रुममध्ये हॅकर, ट्रोलर आणि व्हॉट्सअॅप लीक करणाऱ्या आयटी तज्ज्ञांची फौज असते.
सायबर स्पेस आणि वॉर रुम
अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत हिलरी क्लिंटन यांच्या पराभवाचं सर्वात मोठं कारण म्हणजे सायबर अटॅक. हॅकर्सने हिलरी आणि त्यांच्या टीमचे जवळपास 20 हजार ईमेल आणि 8 हजार अटॅचमेंटमेंट हॅक करुन हिलरी यांच्याविरोधात वापरलं आणि हेच हिलरी यांच्या परभवाला कारण ठरलं. जे अमेरिकेत हिलरी यांच्या बाबतीत झालं, तेच भारतात करण्यासाठी हॅकर्स आणि आयटी तज्ज्ञांची मदत घेऊन विरोधकांना नामोहरम करण्याचा प्रयत्न होताना दिसतोय. म्हणजेच यापुढे निवडणुकीदरम्यान रस्त्यावर होणारी लढाई आता सायबर स्पेस, वॉर रुम किंवा सोशल मीडियातून होईल.
कॅम्पेन रिसर्च कंपनीचा अभ्यास काय सांगतो?
'सिनक्लेचर' या वॉर रुम कॅम्पेनवर रिसर्च करणारी कंपनीच्या माहितीनुसार, 2014 साली सोशल मीडिया कॅम्पेन जोरात होतं. मात्र, त्यावेळ उमेदवार किंवा कुणीही नेता हे आपापल्या पक्षाच्या सकारात्मक गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायचे. ज्याला आपण पॉझिटिव्ह कॅम्पेनिंग म्हणू शकतो. मात्र, आता ट्रेंड पूर्णपणे बदलल आहे. पक्ष किंवा उमेदवार सोशल मीडियाचा वापर विरोधी उमेदावाराच्या निगेटिव्ह कॅम्पेनिंगसाठी वापर करत आहेत आणि याचसाठी 'वॉर रुम'ची निर्मिती केली जातेय.
व्हॉट्सअॅप लीक
आणखी धक्कादायक बाब म्हणजे विरोधी उमेदवाराची वैयक्तिक माहितीचा वापर त्याच्या पराभवसाठी केला जातोय. यासाठी व्हॉट्सअॅपवर अटॅक करण्यात येतो. म्हणजे व्हॉट्सअॅप लीक करण्याचे प्रकार केले जातात.
काही लोकांना पैसे देऊन विरोधकांची माहिती काढली जाते किंवा पैशाचं आमिष दाखवून हेरगिरी करण्यासही सांगितलं जातं. निवडणूक कोणत्याही लढाईपेक्षा कमी नाही आणि प्रत्येक नेता प्राण पणाला लावल्यागत या निवडणुकींच्या रणांगणात उतरतो. आता सोशल मीडियामुळे फक्त ही लढाई 'वॉर रुम'मध्ये होताना दिसतेय.