लंडन: ब्रिटनच्या ICYMI या तंत्रज्ञान कंपनीने ग्राहकांना आता स्मार्ट फोन कायम कनेक्टेड राहण्यासाठी एक अनोखा पर्याय दिला आहे. या कंपनीचे विमान ग्राहकांच्या 5G सुविधेसाठी आता आकाशात फिरत राहणार आहे. त्यामुळे आता ग्राहकांना मोबाईलच्या रेंजसाठी काळजी करायची गरज नाही.


ICYMI ने तयार केलेल्या या विमानात मोबाईलच्या टॉवरमध्ये असलेले सर्व प्रकारचे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. हे विमान आकाशात सलग 9 दिवस राहू शकते. तसेच याचे वैशिष्ट्य म्हणजे, हे विमान हायड्रोजन इंधनावर आधारित असल्याने याच्यापासून प्रदूषणाचा कोणताही धोका नाही. हे विमान चालकरहित सुविधेसह अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे. याचे विंगस्पॅन 197 फुट इतके आहे.


सर्वात महत्वाचे म्हणजे याचे एक विमान किमान 200 मोबाईल टॉवर्सचे काम करते. त्यामुळे कंपन्यांचा टॉवरच्या देखभालीच्या खर्चात आश्चर्यकारक कपात होण्याची शक्यता आहे. कंपनीचा दावा आहे की याच्या एअरबॉर्न 5G टेक्नॉलॉजीमुळे नेक्स्ट जनरेशन सिस्टमच्या 70 टक्के खर्चात कपात होऊ शकते. युकेतील या कंपनीच्या नाविण्यपूर्ण उपक्रमामुळे रेंजच्या आणि इंटरनेटच्या समस्यांपासून ग्राहकांची सुटका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांना आता मोबाईलच्या टॉवरवर अवलंबून राहण्याची काही गरज नाही.





स्टॅटोस्पेरिक प्लॅटफॉर्म लिमिटेडचे सीईओ रिचर्ड डिकीन यांनी याबाबत अधिक माहिती सांगताना सांगितले की, विमानाच्या माध्यमातून आकाशात असणारा टॉवर हा जमिनीपासून 16 हजार फुट उंचीवर असणार आहे. त्यामुळे त्याच्या रेंजचा आवाका आपोआपच जास्त असेल. जमिनीवरचा साधा टॉवर हा काही किलो मीटरच्या परिसरातील मोबाईलची रेंज टिकवून ठेवतो. पण विमानाच्या माध्यमातून आकाशात असणारा हा टॉवर जवळपास 140 किलो मीटरच्या आवारातील रेंज टिकवतो. यामुळे आपला सेलफोन कनेक्ट राहतोच पण इंटरनेटचे स्पीडही 100 एमबी प्रति सेकंद इतके मिळते.


या सुविधेचा उपयोग काही विशेष परिसर, शहर किंवा मुव्हिंग टारगेट म्हणजे बस किंवा ट्रेनमध्ये 5G सेवेच्या पुरवठ्यासाठी केला जाऊ शकतो. तसेच आवश्यकतेनुसार देशाच्या सीमांच्या आतच गरजेनुसार याचा वापर केला जाऊ शकतो. कंपनीने सांगितले आहे की सुरुवातीला पायलट बेसवर 2022 साली याची चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर 2024 साली पूर्ण क्षमतेने ग्राहकांना याचा लाभ घेण्यात येईल.


ढगाळ वातावरणाचा वा इतर हवामानाचा या सुविधेवर कशा प्रकारे परिणाम होईल हे कंपनीने स्पष्ट केले नाही. तसेच एखाद्या शहरावर वा परिसरावर विशेष लक्ष केंद्रीत करताना याची उंची कमी करावी लागेल. अशा वेळी आकाशातील पक्षांना त्याचा काही तोटा होणार का याचीही स्पष्टता कंपनीने दिली नाही.


रॉयटर्स या वृत्तसंस्थेने या संबंधित एक व्हिडिओ ट्विट केला आहे.


महत्वाच्या बातम्या: